वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधिकारी व अंमलदारांसाठी ‘मेडिसिन फ्री लाईफ व स्ट्रेस मॅनेजमेंट’ कार्यशाळा संपन्न
प्रतिनिधि, मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक
पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दैनंदिन कर्तव्यातील ताणतणावातून मुक्तता मिळून त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहावे, या उद्देशाने वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे ‘मेडिसिन फ्री लाईफ व स्ट्रेस मॅनेजमेंट’ (औषधमुक्त जीवन व ताणतणाव व्यवस्थापन) या विषयावरील विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
दि. ९ जून २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयातील क्राईम मीटिंग हॉल येथे झालेल्या या कार्यशाळेत निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ. ओमकार हलमारे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
डॉ. हलमारे यांनी आधुनिक जीवनशैलीत औषधांवर अवलंबून न राहता निरोगी जीवन कसे जगता येईल, याबाबत सविस्तर माहिती दिली. वाढत्या ताणतणावामुळे उद्भवणारे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, आम्लपित्त, पोटाचे विकार व बद्धकोष्ठता यांसारख्या आजारांवर नैसर्गिक उपचार पद्धतींच्या माध्यमातून नियंत्रण कसे मिळवता येते, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
तसेच ताणतणाव कमी करण्यासाठी व रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मॉर्निंग वॉक, योगासने, प्राणायाम, अॅक्युप्रेशर, हर्बल थेरपी व मॅग्नेटिक थेरपीचे फायदे समजावून सांगितले. यासोबतच हेड मसाज थेरपी, वॉटर ड्रिप थेरपी, अरोमा थेरपी व म्युझिक थेरपी यांसारख्या तणावमुक्तीच्या आधुनिक पद्धतींची माहिती देण्यात आली. CLC (Clapping, Laughing, Crying) थेरपीच्या माध्यमातून मानसिक ताण कमी करण्याचे प्रात्यक्षिकही उपस्थितांकडून करून घेण्यात आले.
या कार्यशाळेला जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे व शाखांमधील एकूण ३४ अधिकारी आणि १५५ अंमलदार उपस्थित होते. वर्धा शहर, रामनगर, सेवाग्राम, सावंगी, सेलू, हिंगणघाट, समुद्रपूर, वडनेर, गिरड, आर्वी, आष्टी, कारंजा, तळेगाव, पुलगाव, खरांगणा, देवळी व अल्लीपूर पोलीस स्टेशनसह स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेल, भरोसा सेल, डायल-११२, वायरलेस शाखा, दोषसिद्धी शाखा, वाचक शाखा व पोलीस मुख्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.
कार्यशाळेत शिकविण्यात आलेल्या पद्धतींचा अवलंब करून पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व तणावमुक्त होऊन अधिक प्रभावीपणे जनसेवा करावी, असे आवाहन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत तो आरोग्यवर्धक व उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले.
सदर कार्यशाळेचे आयोजन पोलीस अधीक्षक, वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष चिलांगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.

