*पिपरी नदी घाटावर अवैध रेती उत्खननावर पोलिसांची कारवाई; १० लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त*
*दोन ट्रॅक्टर-ट्रॉलींसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल; विनापरवाना रेती वाहतूक उघड*
महेश निमसटकर
जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर
भद्रावती 9:- तालुक्यातील पिपरी नदी घाट परिसरात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर भद्रावती पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन ट्रॅक्टर, दोन ट्रॉली व रेती असा एकूण १० लाख ६ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील कलम ३०३(२), ३(५) भा.न्या.सं. सह कलम ४७(७), ४८(८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, भद्रावती पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी प्रविणकुमार बावणकर यांना गुप्त बातमीदारामार्फत पिपरी नदी घाट परिसरात अवैध रेती चोरी सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशान्वये पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी नदी घाटाजवळ दोन ट्रॅक्टर व ट्रॉली संशयास्पद स्थितीत आढळून आले.
पोलिसांनी वाहनांची तपासणी केली असता ट्रॉलीमध्ये नदीपात्रातून काढण्यात आलेली रेती भरलेली असल्याचे आढळले. संबंधित चालक व उपस्थित व्यक्तींना रेती उत्खनन अथवा वाहतुकीबाबत वैध परवाना विचारला असता कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.
कारवाईदरम्यान ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३४ एल ५८१६, दुसरा ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३४ बीव्ही ०३६९ व ट्रॉली क्रमांक एमएच ४० सिजे ७२७७ तसेच दोन्ही ट्रॉली व त्यामधील रेती जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालामध्ये ट्रॅक्टर, ट्रॉली व सुमारे ९० ते १०० घनफूट रेतीचा समावेश असून त्याची अंदाजे किंमत १० लाख ६ हजार २४० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी रंजीत शंकर आत्राम (रा. चिरोली, ता. भद्रावती), आदर्श सुभाष मिटपल्लीवार (रा. गवराळा, ता. भद्रावती), संदीप आनंदराव नांदे (रा. पिपरी, ता. भद्रावती) आणि मोहन हनुमान ठाकरे (रा. झाडे प्लॉट, भद्रावती) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम व भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पिपरी नदी घाट परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असून पोलिसांच्या या कारवाईमुळे रेती माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. अवैध उत्खनन व वाहतुकीविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष निपोने यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या नेतृत्वात तसेच भद्रावतीचे पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनात पार पडली.

