*देवळीत एक्सपायरी खाद्यपदार्थांचा सुळसुळाट...!** लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ; प्रशासनाचे दुर्लक्ष की दुकानदारांची मनमानी?

*देवळीत एक्सपायरी खाद्यपदार्थांचा सुळसुळाट...!*

* लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ; प्रशासनाचे दुर्लक्ष की दुकानदारांची मनमानी?

देवळी प्रतिनिधी :-
(रविंद्र पारीसे)

              देवळी शहरात कालबाह्य (एक्सपायरी) पॅकेटबंद खाद्यपदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेषतः शालेय विद्यार्थी आणि लहान मुलांमध्ये लोकप्रिय असलेल्या आलू चिप्स, टकाटक तसेच विविध कंपन्यांच्या पॅकेटबंद खाद्यपदार्थांची एक्सपायरी तारीख संपल्यानंतरही खुलेआम विक्री होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे बालकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
          शहरातील अनेक किराणा दुकाने, पानटपऱ्या आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांमध्ये एक्सपायरी झालेले पदार्थ दुकानांसमोर लटकवून विक्रीसाठी ठेवले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ग्राहकांना वस्तू विकताना त्यावरील कालबाह्यता तारीख तपासली जात नसल्याने अन्न सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
         दरम्यान, अलीकडेच वर्धा येथील गोरस भांडारावर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल २५ लाख ८६ हजार रुपयांचे दुग्धजन्य पदार्थ सील करण्यात आले, तर ६ हजार ३६८ रुपयांचे ताक नाशवंत असल्याने घटनास्थळीच नष्ट करण्यात आले. देश-विदेशात प्रसिद्ध असलेल्या या संस्थेवर कारवाई झाल्यानंतर देवळी शहरातही अशाच प्रकारच्या तपासणी मोहिमा राबविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
        नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शहरात केवळ कालबाह्य खाद्यपदार्थच नव्हे तर तंबाखू, गुटखा तसेच दूध, ताक, खवा आणि पनीर यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेबाबतही शंका उपस्थित होत आहेत. भेसळयुक्त अथवा निकृष्ट दर्जाचे पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. मात्र संबंधित विभागाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
           पॅकेटबंद खाद्यपदार्थांचा सर्वाधिक वापर शालेय विद्यार्थी आणि लहान मुलांकडून केला जातो. चटकदार चव आणि आकर्षक पॅकेजिंगमुळे मुले या पदार्थांकडे सहज आकर्षित होतात. मात्र एक्सपायरी झालेल्या पदार्थांच्या सेवनामुळे अन्नविषबाधा, पोटाचे विकार, उलट्या, जुलाब तसेच दीर्घकालीन आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याचा धोका तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
          शहरातील बस स्टॉप परिसर, इंदिरा गांधी चौक, गांधी चौक, ठाकरे चौक, महावीर चौक, आठवडी बाजार चौक, नवदुर्गा मंदिर चौक, पोस्ट ऑफिस परिसर, मेन रोड आणि इतर व्यापारी भागांमध्ये अन्न व औषध प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे.
        अलीकडेच एका ग्राहकाने खासगी बँकेजवळील दुकानातून चिप्सचे पॅकेट खरेदी केल्यानंतर त्यावरील एक्सपायरी तारीख तपासली असता ती मार्च २०२६ मध्येच संपल्याचे आढळून आले. यामुळे कालबाह्य वस्तूंची विक्री किती बिनधास्तपणे सुरू आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. ग्राहकांच्या आरोग्य आणि सुरक्षेचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला असून संबंधित दुकानांवर कारवाईची मागणी होत आहे.
          विशेष म्हणजे, शहरात अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या नियमांचे पालन होत आहे का, कालबाह्य वस्तूंची तपासणी कोण करणार, दोषी विक्रेत्यांवर कारवाई कधी होणार, असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. प्रशासनाकडून नियमित तपासण्या होत नसल्याने दुकानदारांची मनमानी वाढत असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे.
         देवळी शहरात अन्न व औषध प्रशासनाने तातडीने विशेष तपासणी मोहीम राबवून कालबाह्य खाद्यपदार्थ जप्त करावेत, भेसळयुक्त अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
        देवळीकरांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता अन्न व औषध प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून प्रभावी कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Previous Post Next Post