आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत पियुष गारघाटे यांचे सुयश
विदर्भ मराठवाडा संपादक अब्दुलकदीर जेष्ठ पत्रकार वर्धा जिल्हा
समुद्रपूर : नेपाळची राजधानी काठमांडू येथे ४ जून रोजी आयोजित आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत शिवणफळ येथील पियुष गजानन गारघाटे याने उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी तीन पदके पटकावून देशासह परिसराचे नाव उज्ज्वल केले.
या स्पर्धेत पियुषने कुमिते (लढत) प्रकारात सुवर्णपदक, वैयक्तिक काता प्रकारात रौप्यपदक तर सांघिक काता प्रकारात कांस्यपदक मिळविले. विविध देशांतील स्पर्धकांमध्ये त्याने आपल्या कौशल्याचा ठसा उमटवत ही यशस्वी कामगिरी केली.
पियुष हा गडचिरोली येथील गोंडवाना सैनिकी महाविद्यालयात इयत्ता दहावीत शिक्षण घेत असून कराटे प्रशिक्षक योगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तो सराव करीत आहे. सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि शिस्तबद्ध प्रशिक्षणाच्या जोरावर त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर हे यश संपादन केले.
त्याच्या या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच कराटे प्रशिक्षक योगेश चव्हाण, एनसीसी प्रशिक्षक रहीम पटेल, मोहगाव ग्रामपंचायतीचे प्रशासक विलास नवघरे, राजू नौकरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य फकिरा खडसे, डॉ. महेश गौर, माजी पंचायत समिती सदस्य शेख इस्राईल, माजी उपसरपंच मंगेश गिरडे, माजी सरपंच विजय तडस, प्रा. मेघश्याम ढाकरे, पत्रकार सुधीर खडसे, शांतीलाल गांधी, प्रदीप कुलकर्णी, प्रशांत ठाकूर, बादल वानकर, मानव अधिकार महाराष्ट्र उपाध्यक्ष अब्दुल कदिरअमोल झाडे, प्रफुल कुडे, राहुल गाढवे यांच्यासह ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन केले.
पियुषच्या या यशामुळे शिवणफळ गाव, विद्यालय आणि महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावले असून भविष्यातही तो अधिक मोठे यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

