बिलोलीत मागासवर्गीय मुलींसाठी शासकीय वसतिगृह मंज़ूर खा, डॉ गोपछेडे यांच्या प्रयत्नाला यश. (आंनद करूडवाडे नांदेड ग्रामीण प्रतिनिधि बिलोली ) बिलोली तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना तालुक्याच्या ठिकाणी राहून तेथे उच्च दर्जाचे शिक्षण घेता यावे, यासाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी राज्य सरकारकडे बिलोली येथे मागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी शासकीय वसतीगृह मंजूर करावे, अशी मागणी केली होती. त्यांच्या या प्रयत्न ांना यश आले असून सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी बिलोली येथे मागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी वसतिगृह मंजूर करत असल्याचे पत्र खा. डॉ. अजित गोपछडे यांना पाठवले आहे.बिलोली हा महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेवर बसलेला नांदेड जिल्ह्यातील सर्वात टोकाचा तालुका आहे. या तालुक्यात अनेक गावांचा समावेश असून विद्यार्थ्यांची संख्या ही लक्षणीय आहे. येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. शिवाय या भागात अनेक शैक्षणिक संस्था आहेत. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना याच ठिकाणी राहून शिक्षण घेणे सोयी सुविधांअभावी अडचणीचे ठरत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित निवास, पोषणयुक्त भोजन, अभ्यासासाठी अनुकूल वातावरण आणि शैक्षणिक साहित्य यांची सुविधा मिळावी यासाठी खा. डॉ. गोपछडे यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्याकडेही त्यांनी पाठपुरावा केला होता. अखेर खा. डॉ. गोपछडे यांच्या या सामाजिक विकासाच्या या मागणीची दखल घेत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ आणि बिलोली येथे मागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी शासकीय वसतिगृह मंजूर करत असल्याचे पत्र पाठवले आहे. यासाठी खा. डॉ. गोपछडे हे गेल्या वर्षभरापासून राज्य सरकारकडे पाठपुरावा करत होते. बिलोली तालुक्यातील असंख्य मागासवर्गीय विद्यार्थिनींना आता दर्जेदार आणि गुणात्मक शिक्षण घेण्यासाठी मोठी संधी प्राप्त होत आहे.शासकीय वस्तीगृहात राहून आपले शिक्षण पूर्ण करून देश सेवेमध्ये येण्यासाठी विद्यार्थिनींना आपण शुभेच्छा देत आहोत अशी प्रतिक्रिया खा. डॉ. गोपछडे यांनी दिली. शिवाय बिलोली येथे मागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी शासकीय वस्तीगृह मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस, सामाजिक न्याय मंत्री शिरसाठ आणि राज्य सरकारचेही त्यांनी आभार मानले आहेत.
byMEDIA POLICE TIME
-
0