सकाळी नेहमीप्रमाणे माझा दिवस सुरू झाला. भरपूर ठिकाणी लग्नसमारंभात भेटी देण्याचा दिनक्रम ठरलेला होता.
विदर्भ मराठवाडा संपादक अब्दुलकदीर जेष्ठ पत्रकार वर्धा जिल्हा
आर्वी येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात माझे सहकारी प्रफुल्ल गलहाट यांच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावण्यासाठी मी तेथे पोहोचलो. गाडीतून उतरून कार्यक्रमस्थळी जात असताना मी खिशातून रुमाल काढला. दरम्यान अनावधानाने माझ्या खिशातून काही पैसे खाली पडले. माझ्या ते लक्षात आलं नाही आणि मी पुढे जायला निघालो. तेवढ्यात मागून 'ओ काका.. काका..' अशी हाक ऐकू आली. कोण आवाज देतंय म्हणून मी मागे वळून बघितलं तर हा मुलगा दिसला. त्याने माझ्या खिशातून पडलेले ३५०० रुपये मला आणून दिले. त्यावेळी मला या मुलाचं प्रचंड कौतुक वाटलं. इतक्या कमी वयात फार समज नसते पण या लहान मुलाने इमानदारी जपली हे कौतुकास्पदच आहे.
लहानपणी केलेले संस्कार आणि मनावर बिंबवलेले माणुसकीचे धडे अतिशय महत्त्वाचे असतात. आज दहेगाव मुस्तफा, ता.आर्वी येथे राहणाऱ्या वेदांत संजय भोयर या चिमुकल्याने मला या गोष्टीची पुन्हा एकदा जाणीव करून दिली. धावपळीच्या आयुष्यात माझ्यासाठी ही एक आनंद देणारी अनुभूती होती.
#AmarKale #wardhaloksabha

