देगलूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार अमर राजूरकर यांचा सत्कार.
पिंजारी माहेमूद
तालुका प्रतिनिधी देगलूर नांदेड
देगलूर : नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आ.अमर राजूरकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत सलग विजयाची हॅटट्रीक केली. या विजयानिमित्त देगलूर शहरात आगमन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आ.राजूरकर यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महायुतीच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविण्यात आली होती. निवडणुकीदरम्यान महायुतीला विविध स्तरांवर पाठिंबा मिळाल्याने आ. राजूरकर यांनी मोठ्या फरकाने विजय संपादन केला. या विजयानंतर देगलूर नगरपरिषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी त्यांच्या सन्मानार्थ सत्कार समारंभाचे आयोजन केले. यावेळी नगराध्यक्ष विजयमाला बालाजी टेकाळे, उपनगराध्यक्ष अंकुश देशय देगावकर, बबलू टेकाळे, दिगंबर सावकार कौरवार, अनिल बोंलावार, नगरसेवक सुजित कांबळे, नाना मोरे, सुमित कांबळे, ध्याडे आप्पा (नगरसेवक) यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना आ. अमर राजूरकर यांनी देगलूरवासीयांनी व्यक्त केलेल्या प्रेमाबद्दल व विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि मतदारसंघाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून उपस्थितांनी आ. राजूरकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

