मुंडेंच्या धडाक्याने राज्य हादरले; शहाद्यात मात्र अन्न व औषध प्रशासन 'वेट अँड वॉच' मोडमध्ये!हातगाड्यांवरून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरूच; कारवाईबाबत उलटसुलट चर्चा, शहाद्यात मात्र शांतता

मुंडेंच्या धडाक्याने राज्य हादरले; शहाद्यात मात्र अन्न व औषध प्रशासन 'वेट अँड वॉच' मोडमध्ये!

हातगाड्यांवरून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरूच; कारवाईबाबत उलटसुलट चर्चा, शहाद्यात मात्र शांतता

(प्रा. डी. सी. पाटील नंदुरबार जिल्हा विभागीय उपसंपादक)

शहादा (विशेष वार्तापत्र) :  एकिकडे राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) भेसळयुक्त खाद्यपदार्थ आणि ड्रग्स माफियांवर बेधडक कारवाईचा बडगा उगारला असताना, शहादा शहरात मात्र या विभागाची कमालीची शांतता दिसून येत आहे. रस्त्यावरील हातगाडी विक्रेत्यांसह खुल्या जागांवर अस्वच्छ वातावरणात अन्नपदार्थांची राजरोस विक्री सुरू आहे. यातून नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असतानाही स्थानिक प्रशासन सुस्त असल्याने जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, या सुस्ततेमागे काही वेगळेच गणित तर नाही ना, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

आयुक्त तुकाराम मुंडेंच्या कारवाईचे राज्यभर कौतुक-
    राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या धडक मोहिमेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. दूध, मावा, पनीर आणि ड्रग्स विक्रीचे मोठे रॅकेट उघडकीस आणत मुंडेंच्या पथकाने माफियांवर वचक बसवला आहे. त्यांच्या या धडक कामगिरीचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत असून, त्यांना याच पदावर कायम ठेवण्याची मागणीही नागरिकांमधून होत आहे.

शहाद्यात चित्र उलटे; हॉटेल्समधून पनीर गायब!-
    राज्यात एवढे मोठे धाडसत्र सुरू असताना नंदुरबार जिल्ह्यात, विशेषतः शहादा शहरात अन्न व औषध प्रशासनाने अद्याप एकही ठोस कारवाई केलेली नाही. मात्र, आयुक्त मुंडे यांच्या कारवाईची धास्ती एवढी आहे की, शहरातील अनेक हॉटेल्स आणि डेअरींमधून पनीर अचानक गायब झाले आहे. काही ठिकाणी तर 'पनीर उपलब्ध नाही' असे फलक लावण्यात आले आहेत. यावरून शहरात आतापर्यंत भेसळयुक्त पनीरचा सर्रास वापर होत असल्याच्या संशयाला बळकटी मिळत आहे.

हातगाड्यांवरून 'अस्वच्छ' अन्नविक्री जोरात-
     शहरातील स्टेट बँकेसमोरील जुना मोहिदा रस्ता, खरेदी-विक्री संघासमोर, सप्तशृंगी माता मंदिर रस्ता, डोंगरगाव रस्ता, बसस्थानक परिसर, नगरपालिका चौक आणि गरीब नवाज कॉलनीतील गॅस गोडाऊन परिसर या ठिकाणी हातगाड्यांवर आरोग्याचे कोणतेही नियम न पाळता खाद्यपदार्थ विकले जात आहेत. दोन ते तीन दिवस तेच काळपट तेल वापरणे, अशुद्ध पाण्याचा वापर आणि आजूबाजूला असलेली अस्वच्छता यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. राज्यात सुरू असलेल्या कारवाईमुळे 'आपण खातो ते सुरक्षित आहे का?' असा प्रश्न आता शहादेकरांना पडला आहे.

निवेदनाला केराची टोपली; ग्राहक पंचायतीचा आरोप-
     अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने दोन वर्षांपूर्वीच बाजारात येणाऱ्या बोगस मावा व पनीरमुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार बळावत असल्या तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, प्रशासनाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. नुकत्याच १५ दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत प्रा. डी. सी. पाटील यांनी मिठाईमधील भेसळ व उघड्यावरील अन्नविक्रीचा मुद्दा उपस्थित केला होता, तरीही संबंधित विभागाला जाग आलेली नाही.

प्रशासन फक्त गुटख्यापुरते मर्यादित?
     यापूर्वी राजस्थानमधून शहरात बोगस मावा व पनीर येत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यावर जुजबी कारवाई झाली, मात्र नंतर 'सेटिंग' करून हे व्यवसाय पुन्हा सुरू झाले, असा थेट आरोप नागरिक करत आहेत. सध्या स्थानिक प्रशासन केवळ गुटखा विक्रेत्यांवर किरकोळ कारवाई करून हात झटकत असल्याचे दिसत आहे.

आता तरी धडक कारवाई होणार का?
     राज्यात तुकाराम मुंडे यांच्यासारखे धडाडीचे अधिकारी आल्याने अखिल भारतीय ग्राहक पंचायतीसह शहाद्यातील नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आतातरी जिल्हा प्रशासनाने शहाद्यातील भेसळयुक्त पनीर, मावा आणि अस्वच्छ हातगाडी चालकांवर धडक मोहीम राबवावी, अशी मागणी जोर धरत आहे. शहादेकरांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ थांबणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Previous Post Next Post