मोहम्मद पैगंबर विषयी भडकाऊ व्हिडिओ
मुस्लिम धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी
(श्रीक्षेत्र माहूर तालुका प्रतिनिधी शेख रफीकगाईड माहुर गड)
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिव्या सिंग नामक पॉडकास्टरने तिच्या इन्स्टाग्राम आयडी वर नाजिया इलाही खान नामक महिलेची मुलाखत असलेला एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. सदर व्हिडिओमध्ये नाजिया इलाही खान हिने इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद रसुलुल्लाह सल्ललाहु अलैही वसल्लम तसेच उम्मुल मोमिनीन हजरत आयशा र.अ. यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह, अपमानास्पद व धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्ये केली असल्याचे निदर्शनास आल्याने माहूर शहरातील मुस्लिम समाज बांधवांनी माहूर पोलीस ठाण्यात संबंधिताविरुद्ध तक्रार दाखल केली आहे
सदर व्हिडिओमध्ये संबंधित महिलेने हजरत मोहम्मद रसुलुल्लाह सल्ललाहु अलैही वसल्लम आणि हजरत आयशा र.अ. यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी अत्यंत आक्षेपार्ह, अवमानकारक व अश्लील स्वरूपाची विधाने केली आहेत. अशा प्रकारची विधाने इस्लाम धर्मीयांच्या श्रद्धास्थानांचा अवमान करणारी असून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना गंभीररीत्या दुखावणारी आहेत. संबंधित व्यक्तीने केलेली वक्तव्ये जाणूनबुजून धार्मिक भावना भडकविण्याच्या उद्देशाने करण्यात आली असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
सदर व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यामुळे मुस्लिम समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून सामाजिक व सांप्रदायिक सलोखा बिघडण्याची तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
सदर व्हिडिओची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तींनी जाणूनबुजून धार्मिक भावना दुखावल्या असल्याचे आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील लागू असलेल्या सर्व संबंधित कलमान्वये तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी भविष्यात अशा प्रकारची आक्षेपार्ह व समाजात तेढ निर्माण करणारी सामग्री सोशल मीडियावर प्रसारित होऊ नये यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात व सदर व्हिडिओ संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून तात्काळ हटविण्याची कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असून या निवेदनावर सय्यद अजीमुद्दीन करीम शेख नन्नू शाहरुख खान खैरुल्ला खान अल्ताफ शेख इस्तेखार अजहर शेख हारून शेख जमीर मुस्तकीन शेख मुस्तफा शेख लतीफ शेख इस्माईल नोमान सय्यद शेख आयुब इमरान खान मस्तान खान यांचे सह मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत

