नंदुरबारसाठी स्वतंत्र केळी विकास मंडळ द्या, पपईला मनरेगाचे कवच द्या; शेतकऱ्यांचे केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताईंना साकडे..शहाद्यात शनिवारी केळी-पपई उत्पादकांची महाबैठक

नंदुरबारसाठी स्वतंत्र केळी विकास मंडळ द्या, पपईला मनरेगाचे कवच द्या; शेतकऱ्यांचे केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताईंना साकडे..
शहाद्यात शनिवारी केळी-पपई उत्पादकांची महाबैठक..

प्रा. डी. सी. पाटील
शहादा नंदुरबार जिल्हा विभागीय उपसंपादक 


शहादा :  नंदुरबार जिल्ह्यातील केळी व पपई उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र “केळी विकास मंडळ” स्थापन करावे, केळीचा दर नंदुरबारमध्येच निश्चित करण्याची व्यवस्था करावी, तसेच पपई पिकाला मनरेगा अंतर्गत अनुदानाचा लाभ मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी संघटनांनी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांना निवेदन सादर केले. 
केळी उत्पादक बागायतदार शेतकरी संघर्ष समिती, नंदुरबार जिल्हा केळी-पपई फळ बागायतदार संघ, रयत शेतकरी संघटना व महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक शेतकरी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हे निवेदन देण्यात आले.
जिल्हा नियोजन भवनात महत्त्वपूर्ण बैठक  नंदुरबार येथील जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे व जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या उपस्थितीत शेतकरी प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्यातील मोठ्या संख्येने केळी-पपई उत्पादक शेतकरी व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या प्रमुख समस्या व मागण्या  
बैठकीत शेतकऱ्यांनी वाढते उत्पादन खर्च, मजुरी, सिंचन, खते, कीटकनाशके, वाहतूक खर्च तसेच हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी मांडल्या. केळीच्या दर निर्धारणासाठी बाह्य बाजारपेठांवर अवलंबून राहावे लागत असल्याने न्याय्य भाव मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. 
शेतकरी संघटनांनी मागणी केली की, नंदुरबारसाठी स्वतंत्र केळी विकास मंडळ (Banana Development Board) स्थापन करून त्यामार्फत केळीचे उत्पादन, प्रक्रिया उद्योग, साठवणूक, विपणन, निर्यात, बाजारपेठ विस्तार आणि दरनिर्धारण यांचे नियोजन व्हावे. नंदुरबारमध्ये उत्पादित होणाऱ्या केळीचा किमान व बाजारभाव जिल्ह्यातच निश्चित करण्याचा अधिकार या मंडळाला द्यावा. 
याशिवाय, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाणाऱ्या पपई पिकालाही मनरेगा अंतर्गत अनुदानाचा लाभ द्यावा, जेणेकरून पपई उत्पादकांना आर्थिक आधार मिळून फळबाग क्षेत्राचा विकास होईल, अशी मागणीही करण्यात आली. 
केंद्रीय राज्यमंत्र्यांचे आश्वासन  
केंद्रीय राज्यमंत्री सौ. रक्षाताई खडसे यांनी शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या सकारात्मकपणे ऐकून घेतल्या. संबंधित विषय केंद्र व राज्य शासन स्तरावर मांडून आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
शनिवारी शहादा येथे तातडीची बैठक  
दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या सूचनेनुसार व जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या उपस्थितीत केळी व पपई उत्पादक शेतकऱ्यांची तातडीची बैठक येत्या शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समिती, शहादा येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत केळी उत्पादकांच्या समस्या, अडचणी व उपाययोजनांवर चर्चा होणार असून, सर्व संबंधित शेतकऱ्यांनी उपस्थित राहून आपले प्रश्न व सूचना मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
Previous Post Next Post