आलेगाव येथे धारदार शस्त्राने युवकाचा निर्घृण खूण कारला शिवार आश्रमशाळेच्या गेटसमोरील घटना; संशयित तीन युवक फरार चान्नी आणि पातुर पोलिसांत 'हद्दीचा वाद'; पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप

आलेगाव येथे धारदार शस्त्राने युवकाचा निर्घृण खूण 
 कारला शिवार आश्रमशाळेच्या गेटसमोरील घटना; संशयित तीन युवक फरार
 चान्नी आणि पातुर पोलिसांत 'हद्दीचा वाद'; पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप

पातूर :): अकोला विशेष तालुका प्रतिनिधी 


पातुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या कारला शिवार येथील सुधाकरराव नाईक आश्रमशाळेच्या गेटसमोर रविवारी पहाटेच्या सुमारास एका १७ वर्षीय निष्पाप युवकाचा धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यश गजानन गिऱ्हे असे या दुर्दैवी मृतक युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे आलेगाव आणि परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये कमालीची भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, तीन अज्ञात युवकांनी पूर्ववैमनस्यातून किंवा इतर कारणावरून हा खून केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
पहाटेच्या सुमारास घडले हत्याकांड
सविस्तर माहिती अशी की, सदर घटना आज सकाळी अंदाजे ५ ते ५:३० वाजण्याच्या सुमारास घडली. यश गिरे याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर, त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या यशला तातडीने आलेगाव येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, त्याची गंभीर प्रकृती पाहता डॉक्टरांनी त्याला तातडीने अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) हलवण्याचा सल्ला दिला. परंतु, दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती.
 
गेल्या ४ ते ५ वर्षांत या परिसरातील तरुण युवकाचा खून होण्याची ही दुसरी घटना आहे. एकापाठोपाठ एक घडणाऱ्या या गंभीर गुन्ह्यांमुळे संपूर्ण आलेगाव परिसर हादरून गेला आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा कुठलाही धाक उरलेला नाही का? असा संतप्त सवाल आता सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. पोलीस प्रशासनाकडून गस्त घातली जात असल्याचा दावा केला जातो, मात्र ही गस्त फक्त कागदावरच मर्यादित आहे की काय? अशी जाहीर चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.
 'हद्दीच्या वादात' अडकली खाकी; चानी पोलीस आधी, पातुरचे नंतर!
या घटने दरम्यान पोलीस प्रशासनाचा अतिशय संतापजनक आणि संशयास्पद चेहरा समोर आला आहे. ज्या ठिकाणी यश गिऱ्हे चा खून झाला, ते घटनास्थळ पातुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येते. मात्र, घटनेची माहिती मिळताच चानी पोलीस स्टेशनचे कर्मचारी पातुर पोलिसांपेक्षा आधी घटनास्थळावर हजर झाले. याउलट, पातुर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी "ती आमची हद्दच येत नाही" असे सांगत आपले हात झटकण्याचा प्रयत्न केला. 'तुमची हद्द-आमची हद्द' या पोलिसांच्या टोलवाटोलवीत मोलाचा वेळ वाया गेला. पोलिसांच्या या बेजबाबदार व हलगर्जीपणामुळे जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
> "अवैध धंद्यांना हद्द नसते, मग गुन्ह्यालाच का?"
> घटनास्थळी जमलेल्या संतप्त नागरिकांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले. "पोलीस प्रशासनाला जर अवैध धंदे, दारू किंवा जुगार पकडायचा असेल, तर त्यांना कुठल्याही हद्दीचे बंधन नसते. कारण तिथे त्यांना आर्थिक मलिदा मिळतो. मात्र, एखाद्या नागरिकाचा जीव गेला की स्वतःच्या अंगावरचे घोंगडे झटकण्यासाठी हे पोलीस हद्दीचे कारण पुढे करतात," अशी संतप्त प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिली.
> वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव
घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) गजानन पडघन, चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार दराडे , घुगे आणि पातुर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. मृतदेहाचे अकोला जीएमसी येथे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू असून, पातुर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली असून, या प्रकरणातील संशयित आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.तर घटना घडल्या नंतर अवघ्या काही तासातच चैतन्य काळपांडे, सतीश निमकडे, जतीन क्षीरसागर यांना अटक केली असून पुढील तपास पातूर करीत आहे
Previous Post Next Post