*पिंप्री हादरले! महावितरण कर्मचाऱ्यांच्या धक्काबुक्कीत 78 वर्षीय वृद्धाचा बळी; तिघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा*
नंदुरबार जिल्हा विभागीय उपसंपादक प्रा. डी. सी. पाटील
शहादा : महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या कथित मुजोरी आणि बेजबाबदार तपासणी मोहिमेने एका निष्पाप वृद्धाचा जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना शहादा तालुक्यातील पिंप्री येथे घडली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून पिंप्री गावात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
*नेमके काय घडले-* *ओळखपत्राविना तपासणी आणि अरेरावी*
मिळालेल्या माहितीनुसार, दि. 10 जुलै रोजी सकाळी सुमारे 11 वाजता महावितरणचे 8 कर्मचारी - अजित बालमसिंग नाईक, विजय महाने, योगेश जाधव, राकेश जाधव, पंकज कुंभार, तुषार पाटील, नारसिंग पावरा आणि दिलीप गावित हे पिंप्री गावात वीज जोडणी व मीटर तपासणीसाठी दाखल झाले होते.
गावकऱ्यांच्या आरोपानुसार, या कर्मचाऱ्यांकडे तपासणीचा कोणताही अधिकृत लेखी आदेश नव्हता, तसेच एकाही कर्मचाऱ्याकडे स्वतःचे ओळखपत्र (आयकार्ड) नव्हते. अशा स्थितीत त्यांनी गावात दमदाटी व अरेरावी सुरू केल्याने ग्रामस्थ आणि कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद उफाळला.
*धक्काबुक्कीत वृद्धाचा जागीच मृत्यू-*
याच वादादरम्यान गावातील 78 वर्षीय वयोवृद्ध नथ्थु लिमजी पाटील (रा. पिंप्री) हे तेथे उपस्थित होते. तपासणीच्या पद्धतीबाबत विचारणा करताना वाद वाढला आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना धक्काबुक्की केली.
आरोपींनी पाठीमागून जोराचा धक्का दिल्याने नत्थू पाटील थेट काँक्रीटच्या रस्त्यावर कोसळले. डोके, कपाळ आणि हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांना तातडीने शहादा येथील सार्थक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले. डॉक्टरांनी प्राथमिक अहवालात मारहाणीमुळे दुखापत झाल्याचे नमूद केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
*गावकऱ्यांचा उद्रेक; 8 कर्मचाऱ्यांना घेराव-*
घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण गाव घटनास्थळी लोटले. संतप्त ग्रामस्थांनी तपासणीसाठी आलेल्या आठही कर्मचाऱ्यांना जागीच कोंडीत पकडून घेराव घातला.
गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत मागणी केली की,
"जोपर्यंत दोषी कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही. गरज पडल्यास मृतदेह थेट महावितरण कार्यालयात नेऊन आंदोलन करू!"
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस दल आणि महावितरणचे वरिष्ठ अधिकारी तातडीने पिंप्रीकडे रवाना झाले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गावात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
*अखेर FIR दाखल-*
*तिघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा*
या घटनेच्या दोन दिवसानंतर शहादा पोलीस ठाण्यात मोठी कारवाई करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी तुषार दिलीप पाटील (रा. लोणखेडा), विजय कुसुमपुरी गहाणे (रा. शहादा) आणि पंकज जमनालाल कुंभार (रा. लोणखेडा) या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023चे कलम 105 व 3(5) अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद पाटील करीत असून सर्व बाबींचा सखोल तपास सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे पिंप्री गावावर शोककळा पसरली असून, महावितरणच्या मनमानी आणि जीवघेण्या कारभारावर प्रशासन काय ठोस कारवाई करते, याकडे संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

