*शहाद्यात विषबाधेने खळबळ; 40 विद्यार्थ्यांना विषबाधा, 5 आयसीयूमध्ये - जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी घेतला आढावा*
*दोन महिन्यात जिल्ह्यातील सर्व वस्तीगृहांचे ऑडिट*
नंदुरबार जिल्हा विभागीय उपसंपादक प्रा. डी. सी. पाटील
*बातमी मागची बातमी*
शहादा : समाज कल्याण विभागाच्या शासकीय नवबौद्ध निवासी वस्तीगृहात झालेल्या अन्न विषबाधा प्रकरणाने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. शेवग्याची भाजी, भात आणि पोळी खाल्ल्यानंतर 40 विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ आणि जठरदाहाचा त्रास सुरू झाला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी तातडीने शहादा ग्रामीण रुग्णालयाला भेट देत परिस्थितीची पाहणी केली.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी मिताली सेठी म्हणाल्या,
"शहादा मधील सामाजिक कल्याण वसतिगृहातील 40 मुलांना अन्नातून विषबाधा आणि जठरदाह झाल्याचे निदान झाले आहे. त्यापैकी 25 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 20 जण शहादा ग्रामीण रुग्णालयात असून, 5 मुलांना ऑक्सिजन आणि रक्तदाबाचा त्रास होत असल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या सर्व 25 मुलांची प्रकृती स्थिर असून मी स्वतः डॉक्टरांकडून नियमितपणे माहिती घेत आहे. ग्रामीण रुग्णालयातील बहुतेक मुलांची प्रकृती स्थिर झाली असून त्यांना 24 तास निरीक्षणाखाली ठेवून नंतर घरी सोडण्यात येईल."
जबाबदारी निश्चित करणार, नमुने तपासणीला पाठवले
या घटनेनंतर प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, अन्नाचे नमुने आणि बाधित विद्यार्थ्यांच्या उलट्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर जबाबदारी निश्चित केली जाईल.
"आम्ही मुख्याध्यापक, समाज कल्याण अधिकारी आणि वॉर्डन यांची जबाबदारी निश्चित करण्यावर काम करत आहोत. पोलिसांचे पथकही रुग्णालयात तैनात असून पालकांच्या अडचणी सोडवण्यासाठी पोलीस ठाण्याशी समन्वय साधला जात आहे. पालकांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था केली जात आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले.
पालकांचा संताप कायम, निकृष्ट जेवणाचा आरोप
दरम्यान, बाधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने रुग्णालयात गर्दी केली होती. वस्तीगृहात सातत्याने निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याचा आणि तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
*पुढील दोन महिन्यात सर्व वस्तीगृहांचे ऑडिट-* भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. "पुढील दोन महिन्यांत आम्ही जिल्ह्यातील सर्व वसतिगृहांना भेटी देऊन समस्यांचा सखोल आढावा घेऊ. जिल्हा निधीतून अधिक निधी वाटप करू आणि पालकांसोबत बैठक घेऊन कमतरता दूर करू," असे जिल्हाधिकारी सेठी यांनी सांगितले.
सध्या परिस्थिती नियंत्रणात असून ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रांताधिकारी दीपक गिरासे, वैद्यकीय अधिकारी आणि समाज कल्याण विभागाचे अधिकारी रुग्णालयात ठाण मांडून आहेत.

