यावल गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड यांची तात्काळ बदली करण्यात यावी - शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची मागणी. (यावल प्रतिनिधी( रविंद्र आढाळे)यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड यांच्या मनमानी व दडपशाहीच्या कारभाराविरोधात शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून, त्यांच्या तात्काळ बदलीची मागणी करण्यात आली आहे.यावल तालुक्यातील ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी व पत्रकार यांच्यासोबत गायकवाड यांचे असभ्य वर्तन आणि बेजबाबदार प्रशासकीय कारभार यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितीन सोनार, तालुका प्रमुख राजू काटोके, राष्ट्रवादी (अजित पवार गट) युवकचे जिल्हा उपाध्यक्ष जुगल पाटील, आकाश चोपडे यांच्यासह शिष्टमंडळाने सहाय्यक गटविकास अधिकारी ब. का. पवार यांची भेट घेतली.यावेळी शिष्टमंडळाने गायकवाड यांच्या कारभाराविषयी सविस्तर तक्रारी मांडत त्यांच्या बदलीची मागणी केली. नागरिक, पदाधिकारी व पत्रकार यांना मिळणारी अशोभनीय वागणूक, प्रलंबित तक्रारींचे निवारण न होणे, ग्रामस्थांच्या अडीअडचणींकडे दुर्लक्ष अशा विविध मुद्द्यांवर पवार यांच्यासमोर संताप व्यक्त करण्यात आला.शिष्टमंडळाने इशारा दिला की, जर तात्काळ गटविकास अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली नाही, तर शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव यांनी याप्रकरणी तातडीने लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शिष्टमंडळात नितीन सोनार, जुगल पाटील, राजू काटोके, आकाश चोपडे, सागर सपकाळे, राजू सपकाळे, किरण महाजन, मनोहर पाटील आदी उपस्थित होते.दरम्यान, ब. का. पवार यांनी शिष्टमंडळाशी बोलताना, “आपल्या भावना वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल,” असे आश्वासन दिले.गेल्या दोन वर्षांपासून ग्रामस्थांच्या समस्या तसेच तक्रारी प्रलंबित असून, यावल तालुक्याच्या विकासात गटविकास अधिकारी हे पद केवळ नावापुरते राहिले आहे, अशी भावना महिलांसह अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे चोपडा, रावेर व यावल तालुक्याचे आमदार यांनी देखील या प्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी जोर धरत आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0