ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ, कुटुंबावर ओढवला दुःखाचा डोंगर
(अहिल्यानगर। प्रशांत बाफना विभागीय संपादक)
गणेशोत्सवाचा उत्साह आणि आनंदाचे वातावरण असतानाच जामखेड तालुक्यातील मतेवाडी (जवळा) परिसरात एक अतिशय अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. सोमवारी (दि. १४ सप्टेंबर) गणेश स्थापनेच्याच दिवशी ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून देवांश सचिन मते या अवघ्या सव्वा वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. मते कुटुंबाचा तो एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे मतेवाडी आणि जवळा परिसरावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवांशचे वडील सचिन सुग्रीव मते हे सोमवारी शेतातील मका कुट्टीचे काम उरकून ट्रॅक्टर घेऊन घरी परतले होते. त्यांनी ट्रॅक्टर घराच्या अंगणात आणून लावला. याच वेळी लहानगा देवांश अंगणात खेळत होता. खेळता खेळता तो अचानक ट्रॅक्टरच्या जवळ कधी गेला, हे त्याच्या वडिलांच्या किंवा घरातील कोणाच्याही लक्षात आले नाही.
ट्रॅक्टरच्या हालचालीदरम्यान देवांश नकळत ट्रॅक्टरच्या मागील चाकाखाली आला. चाकाखाली गंभीर चिरडल्या गेल्यामुळे त्याला जबर दुखापत झाली आणि त्याचा जागीच प्राण गेला.
अपघाताची बातमी समजताच घरातील सदस्यांनी एकच आक्रोश केला. एका क्षणात आनंदाच्या वातावरणाचे रूपांतर तीव्र दुःखात झाले. ही हृदयद्रावक बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील ग्रामस्थ, नातेवाईक आणि नागरिकांनी मते कुटुंबीयांच्या घरी तातडीने धाव घेतली.
मते कुटुंबातील एकुलत्या एक चिमुकल्याचा असा अचानक आणि दुर्दैवी अंत झाल्याने मते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेने संपूर्ण मतेवाडी परिसर सुन्न झाला असून सर्वत्र तीव्र शोक व्यक्त केला जात आहे

