नंदुरबार हादरले ! पाच लाखांची सुपारी घेऊन आलेल्या शूटरकडून भररस्त्यात गोळीबार; मध्यप्रदेशातील दोघांसह शहाद्याचा सत्तार ठाकरे गजाआड..
नंदुरबार जिल्हा विभागीय उपसंपादक
प्रा. डी. सी. पाटील
नंदुरबार : पैशांच्या वादातून एका व्यक्तीला ठार मारण्यासाठी पाच लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नंदुरबारमध्ये उघडकीस आला आहे. सुपारी घेऊन मध्यप्रदेशातून आलेल्या दोघा मारेकऱ्यांनी नंदुरबार - चौपाळे रस्त्यावर गोळीबाराची एक फेरी झाडल्याची माहिती समोर आली आहे. शहर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवत दोन शूटर आणि मुख्य सूत्रधाराला अटक केली आहे.
काय आहे प्रकरण ?
नंदुरबार येथील मुकेश अर्जुन चौधरी आणि अनकवाडा, ता. शहादा येथील सत्तार ठाकरे यांच्यात पैशांचा वाद सुरू होता. या वादातून सत्तार ठाकरे याने शहाद्यातील पंकज मिश्रा उर्फ दादू शेठ आणि उज्जैन येथील रवि डाबी यांच्या सांगण्यावरून मुकेश चौधरी याला संपवण्यासाठी सुपारी दिली.
संशयित देवेंद्र गोकुळदास बैरागी आणि अभयसिंग मोहनसिंग चव्हाण (दोघे रा. उज्जैन, मध्यप्रदेश) यांना पाच लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याची कबुली दोघांनी पोलिसांसमोर दिली आहे.
असा झाला गोळीबार -
शुक्रवारी शहरातील पॉलिटेक्निक जवळील चौपाळे रस्त्यावर फायरिंग झाल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. आरोपींनी आधी मुकेश चौधरी यांची रेकी केली होती. सकाळी चौधरी ज्या काळ्या कारमध्ये बसले होते, त्या कारचा पाठलाग करून मोकळ्या जागेत त्यांच्या कारवर एक गोळी झाडली. मात्र वाहनाचा वेग जास्त असल्याने चौधरी थोडक्यात बचावले.
त्यानंतर दोन्ही आरोपी विना नंबर प्लेटच्या दुचाकीने छत्रपती हॉस्पिटलच्या मागील मोकळ्या जागेत लपून बसले होते. चौधरी पुन्हा याच रस्त्याने येतील, या अंदाजाने ते दबा धरून होते.
पोलिसांना माहिती मिळताच पथकाने सापळा रचला. पोलिसांना पाहताच दोघांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडे पिस्तूल असल्याचे माहीत असतानाही पोलिसांनी शिताफीने त्यांना ताब्यात घेतले.
जप्त मुद्देमाल :
त्यांच्याकडून २ गावठी पिस्तूल, ६ जिवंत काडतुसे, एक मोटारसायकल, ३ मोबाईल आणि म्हसावद, शहादा-नंदुरबार, निजर, तळोदा-अक्कलकुवा आदी रस्त्यांचा हस्तलिखित नकाशा जप्त करण्यात आला आहे.
चौकशीत आरोपींनी सांगितले की, टारगेट पूर्ण झाल्यावर ते रायगड जि. तापी (गुजरात) येथील बेहरा शेठ यांच्या घरी मुक्कामाला जाणार होते आणि काम झाल्यावर पाच लाख रुपये मिळणार होते.
या प्रकरणी सहा जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सत्तार ठाकरे याला तात्काळ अटक करण्यात आली आहे. पंकज मिश्रा उर्फ दादू शेठ, रवि डाबी आणि बेहरा शेठ या तिघांचा शोध सुरू आहे.
शहाद्यात खळबळ : दादू शेठ कोण ?
शहाद्यातील पंकज मिश्रा उर्फ दादू शेठ कोण आहे, याची चर्चा आता नागरिकांमध्ये जोरात सुरू आहे. आतापर्यंत शहादा परिसरात सुपारी देऊन खून करण्याचा प्रकार घडला नव्हता, मात्र या प्रकरणात दादू शेठचे नाव समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय अधिकारी हनमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक भुनेश मराठे, अमोल देशमुख, हवालदार प्रशांत पाटील, जगदीश पाटील, विशाल नागरे, विनोद जाधव, राजेश येलवे, नरेंद्र चौधरी, पंकज महाले, राजेंद्र धनगर, जितेंद्र तोरवणे, राजेंद्र कटके, आनंदा मराठे, रुपेश पगारे, ललित गवळी, राहुल राठोड, अमित भरवाड, नरेंद्र पाडवी, अनिल वसावे, विवेक ठाकरे, विनोद महाजन, सिद्धेश्वर बिरारी, संदीप सदाराव, निंबाबाई वाघमोडे यांनी केली.

