शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसाला १२ तास ३ फेज व रात्री १ फेज वीज द्या — उपसरपंच मंगेश गिरडे यांची मागणी. (वर्धा जिल्हा विभागीय संपादक अब्दुलकदीर)गिरड : यंदाच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीनचे पीक हातातून गेले असून, कापसाचेही अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची सर्व आशा रब्बी हंगामातील चना, गहू, ज्वारी, तुर या पिकांवर आहे. या पिकांच्या सिंचनासाठी आवश्यक वीजपुरवठा नियमित मिळावा, यासाठी गिरड ग्रामपंचायतीचे उपसरपंच मंगेश गिरडे यांनी शेतकऱ्यांसह कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, शेती हा आमचा जीवनउपयोगी कारखाना आहे. शेतकरी दिवसभर मशागतीचे काम मजुरांसोबत करीत असतो, तर रात्री पिकांची निगा राखण्यासाठी शेतावर गस्त घ्यावी लागते. मात्र, सध्या रात्रीचा विद्युत पुरवठा पूर्णपणे बंद असल्याने शेतकऱ्यांना आणि मजुरांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे दिवसाच्या वेळी १२ तास ३ फेज व रात्री किमान १ फेज वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.दरम्यान सध्या कापूस वेचणीचा हंगाम सुरू असून, बाहेरील जिल्ह्यांमधून आलेले शेकडो मजूर शेतशिवारात झोपड्या बांधून किंवा गोठ्यात मुक्कामी राहतात. रात्री वीजपुरवठा नसल्याने अंधाराचे साम्राज्य पसरते आणि वन्यप्राण्यांच्या भीतीने हे मजूर जीव मुठीत घेऊन दिवस काढत आहेत. अनेक वेळा रानडुक्कर यांसारखे प्राणी शेतात शिरतात, तर कधी वाघाचा धोका असतो. त्यामुळे कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून रात्री शेतात वीजपुरवठा सुरु ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.वीजपुरवठ्याच्या अभावामुळे सिंचन ठप्प होते, पिकांची वाढ खुंटते आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडतो. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांचा विचार करून रब्बी हंगामात दिवसा १२ तास ३ फेज आणि रात्री १ फेज वीजपुरवठा तातडीने सुरु करावा, अशी ठाम मागणी उपसरपंच मंगेश गिरडे यांनी केली आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0