ज्येष्ठ पत्रकार अनुपकुमार भार्गव यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने श्रद्धांजली!

ज्येष्ठ पत्रकार अनुपकुमार भार्गव यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने श्रद्धांजली!

(महेश निमसटकर
जिल्हा विभागीय संपादक भद्रावती चंद्रपुर)



दि. 24:- नागपूर : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नागपूर विदर्भ अध्यक्ष तथा दैनिक पुलगाव टाइम्सचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार स्व. अनुपकुमार भार्गव यांचे नुकतेच नागपूर येथे उपचारादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या अवघ्या आठ दिवसांपूर्वी त्यांच्या मातोश्री स्व. पार्वतीदेवी यांचेही निधन झाले. या दु:खद प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वन भेट घेऊन स्व. अनुपकुमार भार्गव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी त्यांच्या कार्यकाळातील अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला. विशेषतः ‘दीक्षाभूमी ते मंत्रालय संवाद यात्रा’ तसेच पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी झालेल्या आंदोलनांमध्ये स्व. भार्गव यांनी वसंतराव मुंडे आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गांवकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून सक्रिय सहभाग घेतला होता. पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. पत्रकार चळवळीशी त्यांनी केलेले समर्पण आणि त्यांची कार्यतत्परता पुढील पिढीतील पत्रकारांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

दु:खाच्या या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने भार्गव कुटुंबीयांना रोख आर्थिक मदत व किराणा साहित्य देऊन दुखवटा व्यक्त करण्यात आला. यावेळी स्व. भार्गव यांचे ज्येष्ठ बंधू, नामांकित विधितज्ज्ञ तथा ज्येष्ठ पत्रकार ओमप्रकाश भार्गव, अशोककुमार भार्गव, अतुलकुमार भार्गव, अरविंद भार्गव, त्यांच्या पत्नी, भावजय व चार मुली उपस्थित होत्या. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गांवकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे, मराठवाडा संपर्कप्रमुख कुंडलिक वाळेकर आणि उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख विजय शेळके यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यावेळी स्व. अनुपकुमार भार्गव यांच्या कार्याला अभिवादन करून त्यांच्या कुटुंबीयांना या कठीण प्रसंगी संघटना खंबीरपणे सोबत असल्याचा विश्वास देण्यात आला.
Previous Post Next Post