*गावठी कट्टा बाळगणारा तरुण रावेर पोलिसांच्या जाळ्यात*

*गावठी कट्टा बाळगणारा तरुण रावेर पोलिसांच्या जाळ्यात* 

( जळगाव जिल्हा प्रतिनिधी जितु इंगळे रावेर)

रावेर : रावेर शहरातील बसस्थानकाच्या मागील परिसरात गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एका तरुणाला रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली. ही कारवाई गुरुवार, दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी करण्यात आली.
पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, रावेर बसस्थानकाच्या मागे छोरीया मार्केटजवळ एक इसम शस्त्र बाळगून संशयास्पदरीत्या फिरत आहे. या माहितीची खातरजमा करण्यासाठी गुन्हे शोध पथक परिसरात गेले असता छोरीया मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावर राखाडी रंगाचा फुलबाह्यांचा शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पँट परिधान केलेला तरुण पोलिसांच्या निदर्शनास आला.
पोलिस पथकाला पाहून त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला थांबवून पंचांसमक्ष अंगझडती घेण्यात आली. यावेळी त्याच्याकडून अंदाजे २५ हजार रुपये किमतीचा देशी बनावटीचा लोखंडी धातूचा गावठी कट्टा तसेच एक हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे आढळून आली.
पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव कृष्णा दत्तू पाटील (वय २०, रा. रोकडा हनुमान मंदिर नगर, रावेर) असे सांगितले. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सुकेश तडवी यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३९८/२०२६, भारतीय हत्यार कायदा कलम ३ सह २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर शस्त्र आरोपीने कोठून मिळविले, कोणत्या उद्देशाने खरेदी केले तसेच या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
ही कारवाई मा. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावीत तसेच फैजपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील, सहायक पोलिस निरीक्षक हरिदास बोचरे आणि गुन्हे शोध पथकातील पोलिस हेड कॉन्स्टेबल समाधान ठाकूर, पोलिस कॉन्स्टेबल सुकेश तडवी, श्रीकांत चव्हाण, विकार शेख, प्रमोद पाटील, विशाल पाटील व संभाजी बिजागरे यांनी केली.
Previous Post Next Post