सगरोळीत महावितरणच्या हलगर्जीपणाचा आरोप; विजेचा शॉक लागून युवकाचा मृत्यू.*गरीब कुटुंबातील कष्टाळू तरुण माधव चावरे यांचा दुर्दैवी अंत; लाईमन, ऑपरेटर व संबंधित अभियंत्यांच्या निलंबनाची मागणी .. महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी घेतला तरुणाचा जीव .

सगरोळीत महावितरणच्या हलगर्जीपणाचा आरोप; विजेचा शॉक लागून युवकाचा मृत्यू.


*गरीब कुटुंबातील कष्टाळू तरुण माधव चावरे यांचा दुर्दैवी अंत; लाईमन, ऑपरेटर व संबंधित अभियंत्यांच्या निलंबनाची मागणी ..

 महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी घेतला तरुणाचा जीव .

मारोती एडकेवार 
जिल्हा प्रतिनिधी नांदेड 


नांदेड :बिलोली तालुक्यातील मौजे सगरोळी येथे महावितरणच्या विद्युत दुरुस्तीचे काम सुरू असताना विजेचा शॉक लागून गरीब कुटुंबातील कष्टाळू युवक माधव चावरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे सगरोळी गावासह परिसरात शोककळा पसरली असून महावितरणच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कथित हलगर्जीपणाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. माधव चावरे हे आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मेहनत करणारे कष्टाळू युवक होते. विद्युत दुरुस्तीच्या कामातून नागरिकांच्या घरातील अंधार दूर करून त्यांना प्रकाश देण्याचे काम ते करीत होते. विजेचा धक्का लागून त्यांचा मृत्यू झाल्याने एका गरीब कुटुंबाचा आधार हिरावला गेला आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध एफआयआरची नोंद या दुर्घटनेप्रकरणी महावितरणच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध एफआयआर गुन्हा दाखल प्रक्रिया करण्यात आली आहे. यामध्ये जे. ई. इंजिनिअर अशोक चंद्रवंशी, लाईमन शिवाजी मामीलवाड, शिल्पा वाघमारे आणि ऑपरेटर शंकर सुरुकूटलावार यांची नावे चर्चेत आहेत. या प्रकरणातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची भूमिका तपासून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच संबंधितांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. विद्युत दुरुस्तीचे काम सुरू असताना विद्युत पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला होता का? संबंधित लाईमन व ऑपरेटर यांनी आवश्यक सुरक्षा खबरदारी घेतली होती का? काम करणाऱ्या युवकाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का? असे अनेक गंभीर प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहेत. संबंधित लाईमन, ऑपरेटर व वरिष्ठ अभियंत्यांच्या कथित हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून नेमकी वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी होत आहे.संबंधित कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची मागणी
माधव चावरे यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या संबंधित लाईमन, ऑपरेटर व अभियंत्यांना तातडीने निलंबित करून त्यांच्या भूमिकेची चौकशी करावी. केवळ चौकशीचे आश्वासन देऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करू नये, तर दोषी आढळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
न्याय मिळेपर्यंत मृतदेह हलविणार नाही, ग्रामस्थांची ठाम भूमिका माधव चावरे यांच्या मृत्यूची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर एफआयआर दाखल करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी ग्रामस्थ एकवटले होते. जोपर्यंत संबंधितांवर कारवाई होऊन न्याय मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह हलविणार नाही, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. या भूमिकेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थांनी एकजुटीने प्रशासनाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.मृताच्या कुटुंबाला आर्थिक मदतीची मागणी माधव चावरे यांच्या मृत्यूमुळे एका गरीब कुटुंबाचा कर्ता आधार हिरावला गेला आहे. त्यामुळे मृत युवकाच्या कुटुंबीयांना शासनाकडून योग्य आर्थिक मदत, शासकीय लाभ व न्याय मिळवून द्यावा. तसेच भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत, यासाठी विद्युत दुरुस्तीच्या कामात कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत महावितरणने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.प्रशासनाच्या भूमिकेकडे संपूर्ण गावाचे लक्ष
Previous Post Next Post