मुस्लिम समाजातील कन्येची गगनभरारी! शेख दाफिया सबरीनची एमबीबीएससाठी निवड..कुंडलवाडीच्या लेकीचे घवघवीत यश; डॉक्टर होऊन ग्रामीण रुग्णांची सेवा करण्याचे ध्येय..

मुस्लिम समाजातील कन्येची गगनभरारी! शेख दाफिया सबरीनची एमबीबीएससाठी निवड..

कुंडलवाडीच्या लेकीचे घवघवीत यश; डॉक्टर होऊन ग्रामीण रुग्णांची सेवा करण्याचे ध्येय..

मारोती एडकेवार 
जिल्हा प्रतिनिधी नांदेड 

बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथील अल्पसंख्याक समाजातील व्यापारी कुटुंबातील होतकरू कन्या कु. शेख दाफिया सबरीन, पिता शेख शकील, हिने जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नुकत्याच झालेल्या नीट (NEET) परीक्षेतील यशाच्या बळावर तिची हैदराबाद येथील डॉ. व्ही.आर.के. वुमन्स मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. तिच्या या यशामुळे कुंडलवाडी शहरासह बिलोली तालुक्यातून तिचे अभिनंदन होत आहे.

दाफिया सबरीन हिच्या यशाबद्दल मित्रपरिवार, शिक्षकवृंद आणि समाजातील विविध स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तिने मिळवलेले हे यश परिसरातील विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

आपल्या यशाबद्दल भावना व्यक्त करताना दाफिया म्हणाली, “माझे आजोबा स्व. शेख वजिर अहमद यांचे स्वप्न होते की, आमच्या परिवारातून मी डॉक्टर व्हावे. माझीही डॉक्टर होण्याची मनापासून इच्छा होती. त्यासाठी मी सातत्याने प्रयत्न केले आणि आज माझे स्वप्न साकार होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.”

“माझ्या या यशामध्ये माझी आजी, आई-वडील तसेच के. रामलू पब्लिक स्कूलचे अध्यक्ष सायरेड्डी ठक्कूरवार, संचालिका रमा ठक्कूरवार आणि परिवारातील सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन व योगदान आहे. त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच मला हे यश मिळवता आले. भविष्यात डॉक्टर होऊन ग्रामीण भागातील रुग्णांची सेवा करणे हे माझे प्रमुख ध्येय आहे,” असेही तिने सांगितले.

दाफियाचे दहावीपर्यंतचे शिक्षण कुंडलवाडी येथील के. रामलू पब्लिक स्कूलमध्ये इंग्रजी माध्यमातून झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ती नांदेड येथे गेली. तेथे तिने वैद्यकीय शिक्षणाचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून अहोरात्र मेहनत घेतली. जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर तिने नीट परीक्षेत यश मिळवत एमबीबीएस प्रवेशाचा मार्ग गाठला.

दाफिया सबरीन हिच्या या यशामुळे कुंडलवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. विशेषतः मुस्लिम समाजातील मुलींसाठी तिचा शैक्षणिक प्रवास प्रेरणादायी असून, मुलींनीही मोठी स्वप्ने पाहून शिक्षणाच्या माध्यमातून आपले ध्येय साध्य करावे, असा संदेश तिच्या यशातून मिळतो. भविष्यात डॉक्टर होऊन ग्रामीण भागातील गरजू रुग्णांची सेवा करण्याचे तिचे स्वप्न पूर्ण व्हावे, अशा शुभेच्छा तिच्यावर सर्व स्तरांतून व्यक्त होत आहेत.
Previous Post Next Post