साने गुरुजी कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न... (नंदुरबार जिल्हा विभागीय संपादक) : शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिवस व्याख्यान, समूह नृत्य, गीतांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात आदिवासी दिनाच्या निमित्ताने आदिवासी संस्कृती व वेशभूषेच्या माध्यमातून समुह नृत्य, गाणे व आदिवासी लोककला प्रकाराचे सादरीकरण केले. यावेळी महाविद्यालयातील 122 विद्यार्थ्यांचे 16 ग्रुप सहभागी होते. या ग्रुपला एकलव्य ग्रुप, धरती आबा बिरसा मुंडा ग्रुप, क्रांतिवीर तंट्या मामा भिल ग्रुप, खाज्या नाईक ग्रुप, राणी काजल माता ग्रुप असे आदिवासी संस्कृतीतील योगदान लाभलेल्या विभूतींची नावे देण्यात आली होती. आदिवासी क्रांती दिनाच्या निमित्ताने भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक धरती आबा बिरसा मुंडा यांच्या कार्याविषयी आदिवासी गीताच्या माध्यमातून विविध वेशभूषेवर विद्यार्थ्यांनी केलेले सादरीकरण आकर्षक ठरले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदिवासी एकता परिषदेचे सचिव साहित्यिक संतोष पावरा होते. त्यांनी आपल्या "ढोल" या काव्यसंग्रहातील कवितेचे गायन केले व बासरी वादन करून आपल्या छंदाविषयीचे महत्त्व सांगितले. आदिवासी हा जल, जंगल व जमिनीचे रक्षण करणारा आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. आपण निसर्गाचे पूजक असले पाहिजे म्हणून युवकांनी वृक्ष लावून व जोपासना करून पृथ्वीपुढे येणारे तापमान वाढीचे संकट थांबविले पाहिजे असे मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.सौ.कल्पना पटेल, पर्यवेक्षक प्रा.के.एच. नागेश, प्रा.व्ही.सी. डोळे, प्रा.ए.एम. पाटील, प्रा.ए. पी.पाटील व सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक मंडळाच्या संयोजिका प्रा.कल्पना निकुंभ, प्रा .रंजना गावित, प्रा. उर्मिला पावरा, प्रा. रेखा पाटील, प्रा. मधुकर ठाकरे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अकरावी वर्गातील विद्यार्थिनी नेहा महिरे तर आभार धनश्री वसावे यांनी केले.
byMEDIA POLICE TIME
-
0