परभणी जिल्ह्याला 26 ते 29 मे दरम्यान येलो अलर्ट. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.)परभणी : दि. 26 भारतीय हवामान खाते, प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार परभणी जिल्ह्याकरिता दिनांक 26 ते 29 मे 2025 दरम्यान यलो अलर्ट इशारा देण्यात आलेला आहे. या कालावधीत परभणी जिल्ह्यात वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून खालील प्रमाणे काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.या गोष्टी करा : विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. तसेच नागरिकांनी आपले शेतमाल व पशुधन वेळेतच सुरक्षित स्थळी ठेवावे.या गोष्टी करु नका : आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्या इतकेच धोकादायक आहे.अशी माहिती दिली आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0