36 हजारांची लाच घेताना खिरोद्यातील मुख्याध्यापिकेसह क्लर्क धुळे एसीबीच्या जाळ्यात. (भुसावळ तालुका प्रतिनिधी)(7 जुलै 2025) : विद्यालयात कार्यरत महिला उपशिक्षिकेची प्रसुती रजा मंजूर करण्यासाठी 36 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना जनता शिक्षण मंडळ संचलित खिरोद्यातील धनाजी नाना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनीषा पितांबर महाजन (57, रा.चिनावल रोड, खिरोदा) तसेच कनिष्ठ लिपिक आशिष यशवंत पाटील (27, रा.उदळी, ता.रावेर) यांना धुळे एसीबीने अटक केली आहे. सोमवार, 7 रोजी सायंकाळी झालेल्या या कारवाईने शैक्षणिक वर्तुळातील लाचखोर हादरले आहेत.असे आहे लाच प्रकरणया प्रकरणातील 61 वर्षीय तक्रारदार सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून ते याच संस्थेतून सेवानिवृत्त झाले आहेत तर त्यांच्या स्नुषा या याच शाळेत उपशिक्षिका आहेत. प्रसुती रजा मिळण्यासाठी त्यांनी 2 जून रोजी मुख्याध्यापिका यांच्याकडे अर्ज दिला व तक्रारदाराने सुनेच्या सांगण्यावरून महिला मुख्याध्यापिकेची भेट घेतल्यानंतर प्रसुती रजा मंजूर करण्यासाठी प्रती महिना पाच हजार प्रमाणे सहा महिन्यांचे 30 हजार रुपये मागण्यात आले. 7 रोजी तक्रार दिल्यानंतर लाच पडताळणी लाचेची रक्कम एकूण सहा महिन्यांसाठी 36 हजार रुपये मागण्यात आली व कनिष्ठ लिपिकाने लाच स्वीकारताच मुख्याध्यापिकेलाही अटक करण्यात आली. दोघा आरोपींविरोधात सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.यांनी केला सापळा यशस्वी धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, हवालदार राजन कदम, हवालदार मुकेश अहिरे, हवालदार पावरा, कॉन्स्टेबल रामदास बारेला, चालक मोरे, बडगुजर आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.
byMEDIA POLICE TIME
-
0