यावल निंबादेवी धरणावरून परततांना दुचाकीचा अपघात – १७ वर्षीय तरुण ठार, दोन जखमी. (यावल प्रतिनिधी रविंद्र आढाळे) यावल तालुक्यातील सावखेडा सीम गावाजवळ गुरुवारी रात्री दुचाकीला अपघात होऊन १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. निंबादेवी धरणावरून परततांना दुचाकी समोर अचानक म्हैस आल्याने हा अपघात झाला,गुरुवार दिनांक ३ जुलै रोजी सायंकाळी अकलूद येथील तिघे मित्र – विजय शिवा भिल (वय १७), मयूर सुधाकर सोनवणे (वय ३१) आणि कृष्णा गजानन पवार (वय १८, तिघेही रा. अकलूद, ता. यावल) हे निंबादेवी धरणावर फिरण्यासाठी गेले होते. रात्री धरणावरून परत येत असताना, सावखेडा सीम गावाजवळ त्यांच्या पल्सर दुचाकीसमोर अचानक म्हैस आली. दुचाकी चालवणाऱ्या विजय भिल याने दुचाकीचे ब्रेक दाबले, मात्र चुकून पुढील डिस्क ब्रेक दाबल्याने दुचाकी जागेवर उलटली.या अपघातात तिघेही रस्त्यावर फेकले गेले. विजय भिल हा जागीच ठार झाला, तर मयूर सोनवणे आणि कृष्णा पवार हे गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तात्काळ जखमींना सावखेडा सीम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, त्यानंतर यावल ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून दोघांनाही पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले,दरम्यान यावल पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. विजय भिल याचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला असून, घटनेमुळे अकलूद गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0