माजरी ग्राम पंचायतमधील लिपिक पदभरती रद्द करण्याची मागणी**आमरण उपोषणाचा अन्यायग्रस्तांचा पत्रपरिषदेत इशारा. (*महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती ) भद्रावती, दि. 16:- :- माजरी ग्राम पंचायतमधील लिपिक पदभरती रद्द करण्यात यावी अन्यथा आमरण उपोषण करु, असा इशारा अन्यायग्रस्त परिक्षार्थ्यांनी पत्रपरिषदेत दिला. अन्यायग्रस्त परिक्षार्थ्यांनी पत्रपरिषदेत सांगितले की, मागील तीन वर्षांपासून माजरी ग्राम पंचायतमधील लिपिक पद रिक्त आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर घाईगडबडीने लिपिक पदभरतीची जाहिरात वर्तमान पत्रात देऊन दि.४ नोव्हेंबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचे हाॅल तिकीट दि.२ नोव्हेंबर रोजी परीक्षार्थींना देण्यात आले. जाहिरातीमध्ये परीक्षेत कोणत्या अभ्यासक्रमावर प्रश्न विचारले जातील याची माहिती देण्यात आली नाही. सामान्य चाचणी राहील असे वेळेवर सांगण्यात आले. तसेच एकूण १५ परीक्षार्थींनी ही परीक्षा दिली. त्यात एका परीक्षार्थ्याला १०० पैकी ९४ गुण तसेच मागील सहा वर्षांपासून स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विध्यार्थ्यांला केवळ ७२ गुण कसे मिळाले असाही प्रश्न उपस्थित केला. या परीक्षेचा पेपर परीक्षेपूर्वी फुटला असून ही परीक्षाच रद्द करण्यात यावी व पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद स्तरावर पुन्हा घेण्यात यावी अशीही मागणी अन्यायग्रस्त परिक्षार्थ्यांनी पत्रपरिषदेत केली. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडे तक्रार करण्यात आली असून त्यांनी याप्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिल्याचे पत्रपरिषदेत सांगण्यात आले. पत्रपरिषदेला अविनाश जीवतोडे, मिलिंद शेंडे, रितेश चिकटे, विजया रामटेके, सिलू सिंग आणि विस्मय बहादे उपस्थित होते
byMEDIA POLICE TIME
-
0