रावेर महाविद्यालयात जागतिक एड्स दिनानिमित्त एचआयव्ही-एड्स जनजागृती शपथ.. (रावेर जळगाव सानिया तडवी / रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री व्ही.एस. नाईक महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि रेड रिबन क्लब (RRC) यांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्ही-एड्स जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. १ डिसेंबर जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून जनजागृतीपर उपक्रम व शपथ घेण्याद्वारे विद्यार्थ्यांना जागृत करण्यात आले. ग्रामीण रुग्णालय, रावेर येथील आयसीटीसी विभागाच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.कार्यशाळेत आयसीटीसीचे समुपदेशक श्री. महेंद्र सुरवाडे यांनी एचआयव्ही संसर्गाची कारणे, लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, सकारात्मक जीवनशैलीचे महत्त्व तसेच एचआयव्हीमुळे देशाच्या विकासावर होणारा परिणाम याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. यासह युवा वर्गाची भूमिका, जबाबदारी आणि उपचारपद्धतींबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण मुद्दे स्पष्ट केले.आयसीटीसी समुपदेशक श्री. सुनील महाजन यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील शंका दूर करून एड्सविषयी अधिक माहिती पुरवली. त्यांच्या संवादात्मक सत्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकतेची पातळी अधिक उंचावली.प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री. सुनील कोळी यांनी सिकलसेल आजाराबाबत माहिती देत या आनुवंशिक आजाराची कारणे, लक्षणे, निदान पद्धती आणि उपलब्ध उपचार याबाबत विद्यार्थ्यांना जागृत केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी "एचआयव्ही-एड्स जनजागृती शपथ" घेतली तसेच जनजागृतीपर पोस्टर सादर करून सामाजिक बांधिलकी जपली.ही कार्यशाळा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपप्राचार्य डॉ. एस.डी. धापसे यांनी भूषवले. एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सागर महाजन, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी एल.एम. वळवी आणि महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. एस.बी. राजकुंडल यांनी संपूर्ण कार्यशाळेचे नियोजन केले.विद्यार्थ्यांनी या जनजागृती कार्यक्रमातून मोठ्या प्रमाणावर ज्ञान व प्रेरणा मिळाल्याचे समाधान व्यक्त केले. महाविद्यालयात आरोग्यविषयक उपक्रमांचे असे आयोजन समाजहितासाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे प्रतिपादन आयोजकांनी केले.
byमीडीया पोलीस टाईम
-
0