ग्रामीण युवकांसाठी रोजगाराची आणि स्वयम रोजगाराची नवी दिशा

*ग्रामीण युवकांसाठी रोजगाराची आणि स्वयम रोजगाराची नवी  दिशा 

राजु कांबळे 
मीडीया पोलीस टाईम 
वर्धा जिल्हा विभागीय संपादक 
समुद्रपूर (जिल्हा वर्धा)


पशु आरोग्य सेवक” प्रशिक्षण उपक्रमातून स्वावलंबनाकडे वाटचाल

समुद्रपूर. : व्हि. एस. आर. पी. के. सोल्युशन प्रा. ली. व सह्याद्री लाइव्हस्टॉक सॉल्यूशन प्रा. लि. आणि रुखमाबाई एज्युकेशन सोसायटी सेलू जिल्हा वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी “पशु आरोग्य सेवक” (Animal Health Worker) हा रोजगाराभिमुख प्रशिक्षण उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत उमेदवारांना १ ते ३ महिन्यांचे प्रात्यक्षिक व कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यात येत असून पशुधन व्यवस्थापन, पशु आरोग्य तपासणी, प्राथमिक उपचार, लसीकरण सहाय्य, पशुखाद्य व्यवस्थापन, डेअरी मार्गदर्शन तसेच ग्रामीण पशुसंवर्धन विषयक मूलभूत ज्ञान दिले जात आहे.

आज ग्रामीण भागातील अनेक युवक शिक्षण पूर्ण करूनही रोजगाराच्या शोधात भटकताना दिसतात. दुसरीकडे, पशुपालकांना वेळेवर प्राथमिक पशु आरोग्य सेवा उपलब्ध होत नाही. या दोन्ही समस्यांवर सकारात्मक उपाय म्हणून हा उपक्रम पुढे येत असून “ग्रामीण युवकांच्या हाताला काम आणि मुक्या जनावरांना वेळेवर सेवा” हा या अभियानामागील मुख्य उद्देश आहे.

“मुक्या जनावरांची सेवा हीच खरी मानवसेवा” या भावनेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या ९ महिन्यांमध्ये सुमारे ४० युवकांना प्रशिक्षण देण्यात आले असून अनेक युवक ग्रामीण स्तरावर पशुपालकांना प्राथमिक मार्गदर्शन व सेवा देण्याचे कार्य करत आहेत.

संस्थांच्या वतीने असे सांगण्यात आले की, महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पशुसंवर्धन क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची मोठी गरज आहे. शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने अशा प्रशिक्षण उपक्रमांना योग्य मार्गदर्शन, तांत्रिक सहकार्य व प्रोत्साहन दिल्यास भविष्यात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित व सेवाभावी “पशु आरोग्य सेवक” तयार होऊ शकतात. हे युवक गावागावात पशुपालकांना मदत करून विभागाच्या जनजागृती, प्राथमिक आरोग्य सेवा व पशुधन संवर्धन मोहिमांमध्ये प्रभावी योगदान देऊ शकतील.

“एक प्रशिक्षित युवक म्हणजे एका कुटुंबाचा आधार आणि एका गावासाठी विश्वासाची नवी आशा” — या विचारातून हा उपक्रम ग्रामीण विकास, युवक स्वावलंबन आणि पशुधन संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात येत असून त्यांना पशुसंवर्धन सेवा, डेअरी प्रकल्प व ग्रामीण आरोग्य मोहिमांमध्ये कार्य करण्यासाठी मार्गदर्शनही केले जात आहे.

ग्रामीण युवकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
Previous Post Next Post