कोतवाल ते प्राथमिक शिक्षक साईनाथ आमेटवार यांचा प्रेरणादायी प्रवास कुंभार कुटुंबातील संघर्षाची यशोगाथा

कोतवाल ते प्राथमिक शिक्षक साईनाथ आमेटवार यांचा प्रेरणादायी प्रवास

 कुंभार कुटुंबातील संघर्षाची यशोगाथा

मारोती एडकेवार 
जिल्हा प्रतिनिधी नांदेड 

नांदेड :बिलोली तालुक्यातील हिप्पारगा थडी येथील कुंभार समाजातील अल्पभूधारक अत्यंत गरीब आणि आपला छोटासा विट्टभट्टी चा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबात दि. २५ सप्टेंबर १९८८ रोजी साईनाथ आमेटवार यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच नटखट, हसमुख आणि मनमिळावू स्वभावासोबतच त्यांना शिक्षणाची विशेष आवड होती. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी शिक्षणाच्या जोरावर जीवनात काहीतरी मोठे करण्याची जिद्द त्यांनी कायम मनात बाळगली.साईनाथ आमेटवार यांचे प्राथमिक शिक्षण जि. प. शाळा हिप्परगा थडी व कुंडलवाडी येथे झाले. त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, सगरोळी येथून त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या शैक्षणिक प्रवासात दहावी २००६, बारावी २००८, डी.एड. २०११, पदवी २०१२ आणि बी.एड. २०१४ असा शैक्षणिक क्रम राहिला. शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी शिक्षण पूर्ण करत असतानाच शासकीय नोकरी मिळविण्यासाठीही सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले.
त्यांच्या अथक प्रयत्नांना अखेर २०१५ मध्ये यश मिळाले आणि बिलोली तहसील कार्यालय येथे त्यांची कोतवाल म्हणून शासकीय सेवेत नियुक्ती झाली. त्यानंतर तब्बल अकरा वर्षे त्यांनी तहसील कार्यालयात विविध जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या. तलाठी कार्यालयातील मदत, पीएम किसान योजना, पूरग्रस्तांना मिळणारी आर्थिक मदत, घरपडीचे पैसे तसेच कारकून म्हणून सोपविण्यात आलेली कामेही त्यांनी जबाबदारीने आणि यशस्वीपणे पूर्ण केली.
शासकीय सेवेत कार्यरत असतानाही त्यांनी शिक्षणाची कास कधीच सोडली नाही. आपल्या शिक्षक होण्याच्या स्वप्नासाठी त्यांनी अभ्यासात सातत्य ठेवले. अखेर २०२६ मध्ये त्यांच्या या दीर्घ संघर्षाला आणि मेहनतीला यश मिळाले असून त्यांची प्राथमिक शिक्षक पदावर पहिली निवड गडचिरोली जिल्ह्यात झाली आहे. प्रतिकूल परिस्थितीतून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास शिक्षण, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर यश कसे मिळविता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे.आपल्या यशाबद्दल बोलताना साईनाथ आमेटवार यांनी आपल्या मोठ्या भावाचा बालाजी आमेटवार, राज्य परिवहन चालक तसेच लहान भाऊ पंढरी आमेटवार, लिपिक, हे दोघेही बिलोली आगारात कार्यरत असून त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि पाठिंब्यामुळे हे यश संपादन करता आल्याचे सांगितले.शासकीय सेवेत अकरा वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावल्यानंतर आता ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रात शिक्षक म्हणून नवी जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळाल्याने आमच्या कुटुंबासाठी हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. त्यांच्या पुढील सेवाकार्यासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी आणि यशस्वी वाटचालीस कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थांनी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या.

चौकट - माझे मार्गदर्शक, आधारस्तंभ नेहमी प्रेरणा देऊन उत्साहित करून आम्हा भावंडांना त्यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.त्यांचे मेहनत. जिद्द.प्रामाणिक प्रयत्नांना मिळालेले हे यश निश्चितच आमच्यासाठी अभिमानास्पद आहे - पत्रकार राजेश आमेटवार
Previous Post Next Post