तापी खोरे विकास प्रकल्पाला मिळणार अण्णासाहेब पी. के. पाटील यांचे नाव! आमदार राजेशदादा पाडवी यांच्या पाठपुराव्याला यश;
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे सकारात्मक संकेत
नंदुरबार जिल्हा विभागीय उपसंपादक प्रा. डी. सी. पाटील
शहादा : शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजेशदादा पाडवी यांनी मतदारसंघाच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या तापी खोरे विकास प्रकल्पाला दिवंगत माजी आमदार, सहकार महर्षी अण्णासाहेब पी. के. पाटील यांचे नाव द्यावे, अशी आग्रही मागणी शासनाकडे केली होती.
या मागणीची शासन स्तरावर गंभीर दखल घेण्यात आली आहे. मा. मुख्यमंत्री आणि मा. उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंपदा विभागाचे मंत्री ना. गिरीश महाजन यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.
मंत्री महोदयांनी कळविले आहे की, "सदर बाब धोरणात्मक स्वरूपाची असून सध्या शासनाच्या विचाराधीन आहे. धोरण अंतिम झाल्यानंतर आमदारांच्या विनंतीनुसार यावर सकारात्मक विचार केला जाणार आहे."
आमदार राजेशदादा पाडवी यांच्या सातत्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण पाठपुराव्यामुळे हा विषय आता अंतिम टप्प्यात आला असून, लवकरच तापी खोरे विकास प्रकल्पाला अण्णासाहेबांचे नाव मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
या निर्णयामुळे अण्णासाहेबांवर प्रेम करणारे शेतकरी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

