हिंगणघाटमध्ये स्मार्ट मीटरविरोधात जनआक्रोश मोर्चा; पावसातही हजारो नागरिक ठाम*

*हिंगणघाटमध्ये स्मार्ट मीटरविरोधात जनआक्रोश मोर्चा; पावसातही हजारो नागरिक ठाम*

मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक 

हिंगणघाट : सक्तीने स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया तातडीने बंद करावी, वाढीव वीजबिले कमी करावीत आणि सर्वसामान्य वीज ग्राहकांना दिलासा द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटाच्या वतीने सोमवार, २४ ऑगस्ट रोजी हिंगणघाट येथे भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. आमदार रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या आयोजनातून निघालेल्या या मोर्चाला ग्रामीण तसेच शहरी भागातून हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी स्मार्ट मीटरची सक्ती, वाढीव वीजबिले आणि सर्वसामान्य वीज ग्राहकांवर पडणारा आर्थिक भार याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. स्मार्ट मीटर बसविण्याची जबरदस्तीची प्रक्रिया तात्काळ थांबवावी, वाढून आलेली वीजबिले कमी करावीत आणि ग्राहकांना आर्थिक दिलासा द्यावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

या मोर्चात ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने महिला व पुरुष सहभागी झाले होते. हिंगणघाट शहरातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहत स्मार्ट मीटरविरोधातील आपला संताप व्यक्त केला. त्यामुळे हा मोर्चा हिंगणघाटमध्ये ऐतिहासिक ठरल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मोर्चादरम्यान अचानक पावसाला सुरुवात झाली. मात्र पावसाची पर्वा न करता महिला, पुरुष आणि नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात ठामपणे सहभागी राहिले. पावसात भिजतही आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला आक्रोश व्यक्त केला. त्यामुळे पावसातही सुरू राहिलेला हा जनआक्रोश मोर्चा शहरात चर्चेचा विषय ठरला.

या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे, नागपूर जिल्हाध्यक्ष तथा युवा नेते सलील देशमुख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्मार्ट मीटरच्या माध्यमातून सर्वसामान्य वीज ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळे स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती थांबवून वीज ग्राहकांना दिलासा देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.

हजारो नागरिकांच्या उपस्थितीमुळे हिंगणघाटमध्ये स्मार्ट मीटरविरोधातील नाराजी आणि जनआक्रोश मोठ्या प्रमाणात समोर आला. पावसातही नागरिकांनी दाखविलेला उत्स्फूर्त सहभाग हा या आंदोलनाची विशेष ठरला.
Previous Post Next Post