पातूरमध्ये चोरट्यांची दहशत.
भरदिवसा घरांचे कुलूप तोडून चोरी.
(पातूर अकोला तालुका प्रतिनिधी दूल्हे खान)
पातूर : पातूर शहरात चोरी व घरफोडीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी भरदिवसा बंद घरांना लक्ष्य करत दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरांचे कुलूप तोडून लोखंडी कपाटे फोडली. दोन्ही घटनांमध्ये लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने, चांदीचे साहित्य तसेच मोठ्या प्रमाणात रोख रक्कम चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. सातत्याने घडत असलेल्या या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ढोकणेवाडीत कुलूप तोडून चोरी
प्राप्त माहितीनुसार, पातूर येथील ढोकणेवाडी परिसरातील रहिवासी निलेश श्रीकृष्ण बगाडे यांच्या घरात 28 जून 2026 रोजी दुपारी सुमारे 2 ते 3 वाजण्याच्या दरम्यान चोरीची घटना घडली. घरमालक बाहेरगावी असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी कपाट फोडून त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले.
बंजारा नगरमध्येही भरदिवसा घरफोडी
याच दरम्यान पातूरमधील बंजारा नगर येथील रहिवासी मदन अमरसिंग जाधव यांच्या घरालाही चोरट्यांनी लक्ष्य केले. अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व लोखंडी कपाट फोडले. येथूनही चोरट्यांनी कपाटात ठेवलेले सोने-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम लंपास केली.
दोन्ही घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने असा लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. बंद घरांना लक्ष्य करण्यात येत असल्याने शहरासह तालुक्यातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.ही बातमी लिहीपर्यंत कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली होती आणि पातुर पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

