दुष्काळसदृश परिस्थिती : जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करा : मा.खा. यशवंतराव गडाख पाटील
राजकीय जोडे बाजूला ठेवून बँकेची निवडणूक बिनविरोध करा
(अहिल्यानगर । प्रशांत बाफना विभागीय संपादक)
अहिल्यानगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अनेक भागांत पिके डोळ्यादेखत करपत असून काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचीही तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेची होऊ घातलेली निवडणूक सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन बिनविरोध करावी, असे आवाहन ज्येष्ठ नेते तथा मा.खा. यशवंतराव गडाख पाटील यांनी केले आहे.
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँक ही जिल्ह्याची ‘कामधेनू’ असून, जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने, विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या, महिला बचत गट तसेच शेतकरी सभासदांना बँकेच्या माध्यमातून पतपुरवठा केला जातो. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अर्थकारण मोठ्या प्रमाणावर जिल्हा बँकेशी जोडलेले आहे. अशा परिस्थितीत बँकेची निवडणूक प्रक्रिया राबविताना होणारा अनाठायी खर्च टाळणे आणि बँकेच्या आर्थिक हिताचे संरक्षण करणे गरजेचे असल्याचे गडाख यांनी म्हटले आहे.
जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी सभासदांना सातत्याने मदत करण्याची भूमिका आपण घेतली आहे. सन 1991 ते 2021 या कालावधीत तब्बल 31 वर्षे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तसेच सन 1993 ते 1995 आणि सन 1999 ते 2005 या कालावधीत सात वर्षे बँकेचे चेअरमन म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यामुळे जिल्हा बँकेच्या कामकाजाचा आणि शेतकरी सभासदांच्या प्रश्नांचा जवळून अभ्यास असल्याचे गडाख यांनी सांगितले.सध्या जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांत पावसाअभावी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप पिके धोक्यात आली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनत आहे. अशा वेळी सर्वपक्षीय नेत्यांनी राजकीय मतभेद आणि पक्षीय भूमिका बाजूला ठेवून एकत्र येणे आवश्यक आहे.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा
जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी होणारा मोठा खर्च वाचविण्याबरोबरच बँकेचे संभाव्य नुकसान टाळता येईल. तसेच नेतेमंडळींना निवडणूक प्रचारात गुंतण्याऐवजी दुष्काळाने होरपळलेल्या शेतकरी, नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी वेळ देता येईल. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र बसून राजकीय जोडे बाजूला ठेवत जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यशवंतराव गडाख पाटील यांनी केले आहे

