रोजगार सेवकांच्या कारभारावर ग्रामस्थांचा सवाल!
जॉबकार्डधारकांना रोजगार देताना दुजाभावाचा आरोप; मनरेगा कामांचा हिशोब आणि नोंदी मागविल्या.
मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड :बिलोली : मौजे हिप्परगा थडी (ता. बिलोली, जि. नांदेड) ग्रामपंचायतीअंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत राबविण्यात आलेल्या कामांच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित झाले असून, या कामांची सविस्तर माहिती माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत मागविण्यात आली आहे.
अर्जामध्ये १ एप्रिल २०२४ पासून अर्जाच्या दिनांकापर्यंत मंजूर व पूर्ण झालेल्या मनरेगा कामांची २१ मुद्द्यांवर माहिती मागण्यात आली आहे. यामध्ये कामांची यादी, कामाचे नाव व क्रमांक, मंजुरी दिनांक, मंजूर रक्कम, अंदाजित व प्रत्यक्ष खर्च, वैयक्तिक लाभार्थ्यांची नावनिहाय माहिती, तुषार व ठिबक सिंचन, शेततळे, सिंचन विहीर, शेळीपालन व जनावरांच्या शेडसह विविध कामांची स्वतंत्र माहिती मागविण्यात आली आहे.
याशिवाय मस्टर रोल, हजेरीपत्रक, मोजमाप पुस्तिका (MB), पेमेंट देयके, वर्क रजिस्टर, ग्रामसभा ठराव, बिल-व्हाउचर, प्राप्त निधी व खर्चाची वर्षनिहाय माहिती, तसेच ग्रामरोजगार सेवकाची नियुक्ती, कामकाजाचा अहवाल आणि जॉबकार्डधारकांना मिळालेल्या रोजगाराच्या दिवसांची माहिती मागण्यात आली आहे.
कागदपत्रांची संख्या मोठी असल्यास अभिलेख तपासणीसाठी दिनांक व वेळ कळवावी, तसेच मागितलेली माहिती कार्यालयात उपलब्ध नसल्यास ती कोणत्या कार्यालयात उपलब्ध आहे, याची लेखी माहिती द्यावी, अशी मागणीही अर्जात करण्यात आली आहे.
माहिती अधिकाराच्या नियमानुसार विहित मुदतीत प्रमाणित प्रतींसह संपूर्ण माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या अर्जामुळे हिप्परगा थडी ग्रामपंचायतीतील मनरेगा कामांमध्ये पारदर्शकता आणि शासकीय निधीच्या वापराबाबतचा मुद्दा चर्चेत आला आहे. मागविण्यात आलेली माहिती प्राप्त झाल्यानंतरच कामांमध्ये प्रत्यक्ष अनियमितता झाली आहे किंवा नाही, हे स्पष्ट होणार आहे.

