कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नेवासा तालुक्यातल्या प्रलंबित कामांचा होणार निपटारा...!
आमदार विठ्ठलराव लंघे यांची 'लोकपत'ला खास माहिती...!
(स्पेशल रिपोर्ट प्रशांत बाफना विभागीय संपादक)
पुढील वर्षी म्हणजे २०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याला अवघ्या काही महिन्यांचा कालावधी उरला आहे. या कुंभमेळ्याच्या निमित्तानं नाशिकमध्ये देशभरातल्या भाविकांची अलोट गर्दी होणार आहे. यातले लाखो भाविक नाशिकहून शिर्डी, शनिशिंगणापूर, देवगड आदी ठिकाणी दर्शनासाठी येणार आहेत. मात्र या सर्व पार्श्वभूमीवर नेवासे तालुक्यातल्या अनेक रस्त्यांची कामं अद्यापही प्रलंबित आहेत. या सर्वच रस्त्यांच्या आणि इतरही काही प्रलंबित कामांचा निपटारा कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणार आहे, अशी माहिती आमदार विठ्ठलराव लंघे यांनी ' मिडियाशी बोलताना दिली.
नेवासे तालुक्यातल्या घोडेगाव इथं आमदार विठ्ठलराव लंघे यांची भेट घेतली असता विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्या चर्चेत बोलताना आमदार लंघे यांनी सांगितलं, की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे आम्ही नेवासा तालुक्यातल्या कामांच्या निधीसाठी सातत्यानं पाठपुरावा केला असून राज्य सरकारचा आमच्या त्या पाठपुराव्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नेवासे तालुक्यातल्या श्रीक्षेत्र देवगड संस्थान अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांसाठी ३ कोटी रुपयांच्या निधीला राज्य सरकारने परवानगी दिली असून त्यातून देवगड संस्थानचे मार्गदर्शक वंदनीय भास्करगिरी महाराज यांच्या सुचनेनुसार आवश्यक ती कामं केली जाणार आहेत.
नेवासे तालुक्यातल्या अनेक गावांना राज्य सरकारच्या पुनर्वसन विभागाकडून पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध झाला असून त्यादृष्टीने व्यवस्थित असं नियोजन करुन तो निधी संबंधित गावांना वितरित केला जाणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शनिशिंगणापूर देवस्थानच्या परिसरातही अनेक प्रकारच्या कामांना गती दिली जाणार आहे. सर्वसामान्य माणसाला आणि छोट्या व्यावसायिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ न देता अतिक्रमणांचा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. नेवासे तालुक्यातल्या अनेक ठिकाणच्या छोट्या मोठ्या धार्मिक स्थळांना जोडणारे रस्ते मजबूत केले जाणार आहेत. प्रामुख्याने सोनई - कांगोणी रस्त्यासह अनेक रस्ते कुंभमेळ्याच्या आधी पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत, असंही आमदार लंघे म्हणाले.
आमदार विठ्ठलराव लंघे...! अपूर्ण पाणी योजना आणि 'जलजीवन'चा समाचार घेताय ना...?
घोडेगावच्या बहुप्रतिक्षित पाणी पुरवठा योजनेचं काम अत्यंत संथगतीने सुरु आहे. या योजनेच्या कामाला गती देण्याची गरज आहे. घोडेगावच्या या पाणी पुरवठा योजनेसह सोनईसह १८ गावांसाठीची पाणी पुरवठा योजना प्रलंबित आहे. याशिवाय गेल्या काही वर्षांपासून गैरव्यवहारात अडकून पडलेलं केंद्र सरकारचं जलजीवन मिशन अभियान हे नेवासे तालुक्यातही वादग्रस्त ठरलं आहे. या अभियानाअंतर्गत सोनईसह अनेक ठिकाणी ज्या पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या आहेत, ती कामं अत्यंत निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. अर्थात या आणि अशा अनेक कामांची मंजुरी आमदार लंघे यांच्या कार्यकाळातली नसली तरी या कामांची सद्यस्थिती आणि दर्जा काय आणि कसा आहे, यामध्ये सरकारचा पर्यायाने जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला आहे, त्या सर्वच कामांचा आढावा आमदार विठ्ठलराव लंघे यांनी घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळेच नेवासे तालुक्यातल्या अपूर्ण पाणी योजना आणि 'जलजीवन'चा समाचार घेताय ना, असं जाहीर आवाहन करत आहोत.
ताकाला जाऊन भांडं का लपवता : आमदार लंघे...!
नेवासे तालुक्यात सोशल मीडियावर काही 'फेक' अकाऊंटच्या माध्यमातून आजी माजी लोकप्रतिनिधींविषयी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्या जाताहेत. आमदार विठ्ठलराव लंघे यांना यामध्ये प्रचंड प्रमाणात 'ट्रोल' केलं जात आहे. याकडे आमदार लंघे यांचं लक्ष वेधून घेतलं असता ते म्हणाले, 'या मागे कोण आहे, नक्की कोण कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे सारं करतंय, याबद्दल आमच्याकडे ठोस माहिती असून ती सर्व माहिती अहिल्यानगर सायबर क्राईम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. या विभागाच्या अधिकाऱ्यांचा यादृष्टीने योग्य तो तपास सुरु आहे. लवकरच या सर्वांचा सोक्षमोक्ष लावला जाणार आहे. ही एक प्रकारची विकृत मानसिकता आहे. ज्या कोणाला काही आरोप करायचे आहेत, ते त्यांनी पुराव्यानिशी करावेत. उगीचच कोणाचीही प्रतिमा मलीन करण्याचा उद्योग कोणी करु नये. या मागे जे कोणी बदनामीचं षडयंत्र रचत आहेत, ते ताकाला जाऊन भांडं लपवत आहेत, असा प्रश्न उपस्थित करत आमदार लंघे यांनी टिकाकारांना एक प्रकारे सज्जड इशारा दिलाय

