"मधमाश्यांचा अंतराळातील अनोखा प्रवास "

"मधमाश्यांचा अंतराळातील अनोखा प्रवास "  


(प्रशांत बाफना विभागीय संपादक 8055440385)

 "अमेरिकेचे स्पेस शटल चॅलेंजर एसटीएस-४१- सी अंतराळ यान एप्रिल १९८४ मध्ये अंतराळातील एका सदोष उपग्रहाची दुरूस्ती करण्यासाठी अवकाशात झेपावले होते.तेव्हा या मोहिमेदरम्यान सजीवांवर प्रयोग करण्यासाठी ३००० पेक्षा जास्त मधमाश्यांना एका विशेष पेटीत ठेवून अंतराळात नेण्यात आले होते. तब्बल ५२ वर्षानंतर मधमाश्यावर केलेल्या प्रयोगाची माहिती अधिकृतपणे नुकतीच पुढे आली आहे.ती माहिती तपशीलात विशद करणार्‍या या लेखाचा सुसूत्र, सविस्तर गोषवारा असा:—
             संघटित सामाजिक जीवन, उड्डाण करण्याची क्षमता आणि स्वतःच्या शरीरातून मेण तयार करून विशिष्ट रचनेचे पोळे तयार करण्याची विलक्षण क्षमता या कारणास्तव अंतराळातील प्रयोगासाठी मधमाश्यांची निवड करण्यात आली होती.कार्ल फाॅन फ्रिश या ऑस्ट्रियन प्राणीशास्राने असे म्हटले होते की, "जगातील सर्वांधिक संशोधन झालेला आणि आजही संशोधन सुरू असलेला एकमेव कीटक म्हणजे मधमाशी."नासाने हाती घेतलेला शोधप्रयोग फ्रिश यांच्या विधानास पुष्ठी देतो.
            पृथ्वीवर मधमाश्या गुरूत्वाकर्षणाच्या वातावरणात राहतात. उडताना आणि एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाताना त्यांच्या शरीराला वर- खालची दिशा आणि स्वतःचा समतोल राखण्याची सवय असते.परंतू अंतराळातील सूक्ष्म गुरूत्वाकर्षणाच्या वातावरणात ही परिस्थिती पूर्णपणे बदलते.त्यामुळे अंतराळ प्रयोगातील मधमाश्यांना सुरवातीच्या काळात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.त्या पेटीच्या भिंतीवर आदळत होत्या.पृथ्वीवरील गुरूत्वाकर्षणाला सरावलेल्या त्यांच्या शरीराला अंतराळातील वजनहीन वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी वेळ लागत होता.अखेर मधमाश्यांनी अत्यंत कमी कालावधीत या नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सुरूवात केली. जसजसे दिवस पुढे गेले,तसतसा त्यांच्या हालचाली अधिक नियंत्रित होऊ लागल्या.सुरूवातीला भिंतीवर आदळणार्‍या मधमाश्या हळूहळू पेटीमध्ये सुरक्षितपणे इकडून तिकडे उडू लागल्या.मोहिमेच्या सातव्या दिवसापर्यंत त्यांनी सूक्ष्म गुरूत्वाकर्षणाच्या वातावरणाशी मोठ्या प्रमाणात जुळवून घेतल्याचे दिसून आले. 
           या प्रयोगातील सर्वांत थक्क करणारी बाब म्हणजे गुरूत्वाकर्षण नसतानाही मधमाश्यांनी अंतराळात पोळे तयार करण्यास सुरवात केली होती.पृथ्वीवर मधमाश्या मेणाच्या साहाय्याने षट्कोनी पेशींनी बनलेले पोळे तयार करतात.या पोळ्यात अंडी,अळ्या, मध आणि परागकण साठवले जातात. अंतराळातील परिस्थिती मात्र पृथ्वीपेक्षा पूर्णपणे वेगळी होती.तरीही मधमाश्यांनी आपली नैसर्गिक पोळे बांधण्याची प्रवृत्ती कायम ठेवली होती. अंतराळात तयार झालेल्या पोळ्याचा अभ्यास केल्यानंतर त्याच्या पेशींच्या रचनेत पृथ्वीवरील पोळ्यांच्या तुलनेत काही फरक आढळून आले. यावरून पोळ्याची निर्मिती केवळ गुरूत्वाकर्षणावर अवलंबून नसून मधमाश्यांच्या जैविक आणि सामाजिक वर्तनाशीही संबंधित असल्याचे स्पष्ट झाले.या प्रयोगातून मधमाश्यांच्या जीवनचक्राबाबतही महत्त्वाची निरीक्षणे करण्यात आली.राणी मधमाशीने अंतराळातील परिस्थितीत अंडी घातल्याचे आढळले. यामुळे पृथ्वीपासून दूर असलेल्या आणि गुरूत्वाकर्षणाच्या दृष्टीने वेगळ्या वातावरणातदेखील मधमाश्यांच्या मूलभूत जैविक प्रक्रिया सुरू राहू शकतात,हे समजण्यास मदत झाली.अर्थात याचा अर्थ अंतराळातील वातावरण मधमाश्यांसाठी पृथ्वीइतकेच अनुकूल आहे असा होत नाही. अंतराळातील विकिरण,तापमान, हवेची रचना,अन्नाची उपलब्धता आणि गुरूत्वाकर्षणातील फरक यांसारख्या अनेक घटकांचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.त्यामुळे या विषयावर पुढील संशोधनाची आवश्यकता आहे.
         अनेक वनस्पतींच्या उत्पादनासाठी परागीभवन आवश्यक असते.पृथ्वीवर हे काम मधमाश्या आणि इतर परागीभवन करणारे कीटक मोठ्या प्रमाणावर करतात. त्यामुळे भविष्यात चंद्र किंवा मंगळावरील बंदिस्त शेतीमध्ये मधमाश्यांचा उपयोग पिकांच्या परागीभवनासाठी करता येईल का,हा एक महत्त्वाचा वैज्ञानिक प्रश्र्न आहे. अंतराळातील कमी गुरूत्वाकर्षणामध्ये मधमाश्या फुलांपर्यत योग्य प्रकारे पोहोचू शकतात का,त्यांचे उड्डाण किती प्रभावी राहते आणि त्या पिकांचे पुरेसे परागीभवन करू शकतात का,याचा सखोल अभ्यास करावा लागेल.
          या प्रयोगातून निसर्गाच्या अनुकूलनक्षमतेचा एक विलक्षण नमून समोर आला.१९८४ मधील नासाचा मधमाश्यावरील प्रयोग त्यामुळे एक साधा अंतराळ प्रयोग नव्हता. त्यातून अंतराळातील जीवसृष्टी,सजीवांची अनुकूलन क्षमता आणि भविष्यातील अवकाश शेती यांबाबत विचार करण्याची नवी दिशा मिळाली.लहानशा शरीराच्या मधमाश्यांनी अंतराळात जाऊन मानवाला एक मोठा संदेश दिला—परिस्थिती कितीही वेगळी आणि आव्हानात्मक असली, तरी जीवन त्याच्याशी जुळवून घेण्याचा मार्ग शोधत असते. भविष्यात चंद्रावर किंवा मंगळावर मानवी वस्ती उभी राहिली आणि तेथे हिरवीगार शेती फुलली,तर त्या शेतीच्या परागीभवनात एखादी मधमाशीही आपली छोटीशी भूमिका बजावताना दिसू शकते.त्यामुळे अंतराळातील मधमाश्यांचा हा प्रवास केवळ वैज्ञानिक कुतूहलाचा विषय नसून,मानवाच्या पृथ्वीबाहेरील भविष्यातील जीवनाची एक छोटी पण आशादायक झलक आहे
Previous Post Next Post