*बेलापूर येथे मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज स्टडी हॉलची मागणी*

*बेलापूर येथे मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज स्टडी हॉलची मागणी*

(अहिल्यानगर विभागीय संपादक/प्रशांत बाफना :)

 महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे मा. अध्यक्ष श्री. प्यारे खान साहेब यांची भेट घेऊन बेलापूर परिसरातील मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज स्टडी हॉल (अभ्यासिका) उभारण्यासह गरीब व गरजू नागरिकांसाठी विविध शैक्षणिक, रोजगार व कौशल्य विकासाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.

गौसे आजम सेवाभावी संस्था, बेलापूर यांच्या वतीने संस्थेचे संस्थापक मुख्तार सय्यद व अध्यक्ष सुलतान सलीम शेख यांनी हे निवेदन सादर केले.

बेलापूर, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर येथे मुस्लिम समाजाची मोठी लोकसंख्या वास्तव्यास असून या समाजातील अनेक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या गरीब व मध्यमवर्गीय आहेत. मुस्लिम समाजातील अनेक विद्यार्थी MPSC, UPSC, पोलीस भरती, विविध सरकारी नोकऱ्या तसेच उच्च शिक्षणासाठी तयारी करीत आहेत. मात्र, बेलापूर परिसरात विद्यार्थ्यांसाठी सार्वजनिक व आवश्यक सुविधांनी युक्त अशी सुसज्ज अभ्यासिका उपलब्ध नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शांत व योग्य वातावरणात अभ्यास करणे कठीण होत आहे.

विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या घरामध्ये स्वतंत्र अभ्यासाची जागा उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत आहे. त्यामुळे बेलापूर येथे मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज स्टडी हॉल उभारण्यात यावा, अशी प्रमुख मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

प्रस्तावित स्टडी हॉलमध्ये विद्यार्थ्यांसाठी टेबल व खुर्च्या, पुरेसा प्रकाश, पंखे, स्वच्छ पिण्याचे पाणी, पुस्तक कपाट, संदर्भ पुस्तके, MPSC, UPSC व इतर स्पर्धा परीक्षांची पुस्तके, संगणक व इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, करिअर व उच्च शिक्षणासंदर्भात आवश्यक मार्गदर्शन मिळावे, अशीही मागणी करण्यात आली.

निवेदनामध्ये मुस्लिम समाजातील गरीब व गरजू नागरिकांसाठी शासकीय व अल्पसंख्याक कल्याण योजनांची माहिती व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. अनेक पात्र नागरिकांना शिष्यवृत्ती, कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार व इतर शासकीय योजनांची पुरेशी माहिती नसल्यामुळे ते या योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे बेलापूर येथे विशेष मार्गदर्शन व सहाय्य शिबिर आयोजित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

युवकांसाठी कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन शिबिरे आयोजित करावीत, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शैक्षणिक योजनांचा लाभ मिळवून द्यावा तसेच महिलांसाठी कौशल्य विकास व स्वयंरोजगाराच्या योजनांची माहिती व आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.

तसेच बेलापूर परिसरातील मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक गरजांचा प्रत्यक्ष आढावा घेऊन संबंधित जिल्हा व तालुका प्रशासनाकडून आवश्यक माहिती व अहवाल मागवून पुढील कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

गौसे आजम सेवाभावी संस्था, बेलापूर यांच्या उद्दिष्टांमध्ये शिक्षणाचा प्रसार, कौशल्य व तांत्रिक शिक्षण, संगणक साक्षरता, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, गरीब व गरजू नागरिकांना मदत तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविणे यांचा समावेश आहे. त्यामुळे स्टडी हॉल उभारणे व गरीब-गरजू नागरिकांसाठी विविध सहाय्य उपक्रम राबविणे ही मागणी संस्थेच्या सामाजिक व शैक्षणिक उद्दिष्टांशी सुसंगत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

“आज एका विद्यार्थ्याला अभ्यासासाठी योग्य जागा उपलब्ध झाली, तर उद्या तोच विद्यार्थी आपल्या कुटुंबाचा आणि समाजाचा सक्षम आधार बनू शकतो. त्यामुळे स्टडी हॉल ही केवळ एक सुविधा नसून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण संधी आहे,” असे संस्थेच्या वतीने निवेदनात नमूद करण्यात आले.

या सर्व मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक व सकारात्मक विचार करून बेलापूर परिसरातील मुस्लिम समाजातील विद्यार्थी, युवक, महिला तसेच गरीब व गरजू नागरिकांसाठी आवश्यक सुविधा व शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांकडे आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी गौसे आजम सेवाभावी संस्था, बेलापूर यांच्या वतीने करण्यात आली
Previous Post Next Post