भारतीय संविधान – लोकशाहीचा खरा प्राणवायू!**२६ नोव्हेंबर : संविधानिक मूल्यांचा जागर करण्याचा दिवस*

*भारतीय संविधान – लोकशाहीचा खरा प्राणवायू!*
*२६ नोव्हेंबर : संविधानिक मूल्यांचा जागर करण्याचा दिवस*

मुख्य संपादक हमीद तडवी

*जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताची ओळख आहे. या लोकशाहीचा भक्कम पाया म्हणजे भारतीय संविधान! २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने भारतीय संविधानाचा स्वीकार केला. तर २६ जानेवारी १९५० पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि आत्मपरीक्षणाचा दिवस आहे.*
*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधानाच्या मसुदा समितीने देशाला एक महान लोकशाही दस्तऐवज दिला.भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा आधार दिला.* *जात, धर्म, भाषा, पंथ किंवा लिंग यापलीकडे जाऊन प्रत्येक नागरिकाला समान सन्मान आणि अधिकार मिळावेत, हा संविधानाचा मूलभूत विचार आहे.*
*भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जीवनाला दिशा देणारा मार्गदर्शक दस्तऐवज आहे. मात्र, आजही समाजात जातीय भेदभाव, अन्याय, भ्रष्टाचार, विषमता आणि दुर्बल घटकांचे शोषण दिसून येते. अशा परिस्थितीत संविधानातील मूल्ये केवळ भाषणांपुरती मर्यादित न ठेवता ती प्रत्यक्ष आचरणात आणणे ही काळाची गरज आहे.*
*आजच्या संविधान दिनानिमित्त शासनाच्या सर्व विभागांनी, जिल्हा परिषद शाळांनी, महाविद्यालयांनी, ग्रामपंचायतींनी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी संविधान जागृतीसाठी ठोस उपक्रम राबविणे आवश्यक आहे. प्रत्येक शाळेत संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन, निबंध, वक्तृत्व स्पर्धा आणि संविधानिक मूल्यांवर आधारित उपक्रम आयोजित केले पाहिजेत. कारण आजचे विद्यार्थी हे उद्याच्या लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत.*
*संविधानाने नागरिकांना अधिकार दिले आहेत, त्याचबरोबर कर्तव्यांची जाणीवही करून दिली आहे. शासनाच्या कामकाजात पारदर्शकता मागणे,* *अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे, माहितीच्या अधिकाराचा योग्य वापर करणे आणि लोकशाही प्रक्रियेत सहभागी होणे ही सुजाण नागरिकांची जबाबदारी आहे.*
*संविधानाचा सन्मान म्हणजे केवळ संविधान दिनी प्रास्ताविकेचे वाचन करणे किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करणे नव्हे; तर प्रत्येक व्यक्तीला समान वागणूक देणे, महिलांचा सन्मान करणे, सामाजिक सलोखा राखणे आणि अन्यायाला विरोध करणे होय.*
*चला, यंदाच्या संविधान दिनी 'घर घर संविधान' ही संकल्पना केवळ घोषणा न ठेवता ती प्रत्येक घरात, शाळेत, कार्यालयात आणि समाजात रुजविण्याचा संकल्प करूया. संविधान समजून घेऊया, त्यातील मूल्ये आचरणात आणूया आणि लोकशाही अधिक बळकट करूया.*
*कारण संविधानाचा खरा सन्मान समारंभातून नव्हे, तर आपल्या विचारांतून आणि कृतीतून झाला पाहिजे. घराघरात संविधान पोहोचले, तरच लोकशाहीचा पाया अधिक मजबूत होईल!*
Previous Post Next Post