राजुरी-बेल्हे जिल्हा परिषद गटात पंकज कणसे यांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु , बाकीच्यांचे अजून तळ्यात मळ्यातच. (जुन्नर तालुका प्रतिनिधी संदीप शितोळे ) बेल्हे, ता. ३० :- पुणे जिल्हा परिषदेच्या जागेच्या आरक्षणाची सोडत झाली आणि जुन्नर तालुक्यातील प्रत्येक गटात इच्छुकांच्या हालचालींना वेग यायला सुरुवात झाली आहे. सोशल मीडिया किंवा बॅनरबाजीच्या माध्यमातून लोकापर्यंत पोहोचण्यासाठी इच्छुकांची चढाओढ पाहायला दिसत असून, हात-जोडी, पाया पडी, तुझ्या-माझ्या गळ्यापडी आणि नामकरण विधीपासून ते अंत्यविधीपर्यंत एकही कार्यक्रम चुकवताना इच्छुक दिसत नाहीत. बेल्हे-राजुरी गटात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला हे आरक्षण झाले असून या गटातील पंकज कणसे यांनी प्रचारात प्रचंड आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. जुन्नर तालुक्यातील पूर्वपट्यातील राजुरी-बेल्हे गट हा आरक्षणाच्या सोडतीमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव झाल्याने इच्छुक पुरुषांच्या इच्छा आकांक्षा धुळीस मिळाल्या असून ठीक आहे, मला नाही तर माझ्या बायकोला जिल्हा परिषदेचे तिकीट मिळवण्याचे प्रयत्न या गटात चालू झाले आहेत. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांनी या गटात माजी आमदार अतुल बेनके यांच्या माध्यमातून भरपूर विकास कामे केली असल्याने त्यांची या गटावर बऱ्यापैकी पकड होती परंतु हा गट नागरिकांचा मागासप्रवर्ग महिलेसाठी राखीव झाल्याने आणि गटाचेही भौगोलिक आरक्षण बदली झाल्याने सध्या पांडुरंग पवार यांनी आपल्या सुनबाई बोरी गटातून उभे करण्याचे ठरविले आहे असे समजते. त्यामुळे बेल्हे राजुरी गटातील पंकज कणसे, अतुल भांबेरे, वल्लभ शेळके, प्रदीप पिंगट, सचिन गवळी या इच्छुकांना आपल्या भावनेला मुरड घालून आपल्या सौभाग्यवतींना जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरवण्याचे ठरविले आहे परंतु वल्लभ शेळके व प्रदीप पिंगट यांचे अजूनही तळ्यात मळ्यातच चालू असल्याने याचा फायदा पंकज यांचे यांनी घेतला व निवडणूक प्रचारात प्रचंड अशी आघाडी घेतली आहे. या गटांमध्ये राजुरी, उंचखडक, गुळचवाडी, नळावणे, आणे, पेमदरा, शिंदेवाडी, बेल्हे, गुंजाळवाडी, तांबेवाडी, रानमळा, साकोरी, मंगरूळ या गावांचा समावेश आहे. यापूर्वी या गटातून पांडुरंग पवार, स्व. राजाभाऊ गुंजाळ, स्नेहल शेळके या गटातून निवडणूक जिंकून प्रतिनिधित्व केले आहे. या गटात प्रामुख्याने कल्याण आहिल्यानगर मार्गावरील अपघातांच्या समस्या, पठार भागातील पाण्यांच्या समस्या, रस्त्यांची दुरवस्था, आरोग्य समस्या आणि राजकीय समीकरणे या विषयांचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. याशिवाय कोणता उमेदवार कोणत्या राजकीय पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढणार याकडेही मतदारांचे लक्ष लागले आहे. राजुरी-बेल्हे गटातून मा. जिल्हा परीषद सदस्या स्नेहल वल्लभ शेळके, स्व. राजाभाऊ गुंजाळ याच्या सुविद्य पत्नी माधुरी राजेंद्र गुंजाळ, वर्षा प्रदीप पिंगट, राजुरी ग्रामपंचायत माजी सदस्या प्राध्यापक शांता संजय गवळी, स्मिता पंकज कणसे, निलम अतुल भांबेरे यांची नावे इच्छुक म्हणून पुढे येत आहेत. पक्षीय बलाबल पाहता राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन पक्षांभोवती निवडणूक फिरताना दिसत असली तरी, यावेळी विद्यमान आमदार शरद सोनवणे यांची भूमिका ही निर्णायक ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या पक्षात झालेल्या फाटा फुटीमुळे या गटातील निवडणुक मोठी रंगतदार पाहायला मिळणार आहे. याशिवाय पठार भागावरील अमोल शिंदे, सचिन आहेर, प्रशांत दाते, अजय शिंदे, रोहिदास शिंदे यांच्याही भूमिकेकडे मतदार लक्ष ठेवून आहेत. पठार भागातील मतदार कोणाच्या पारड्यात आपले बहुमूल्य मत टाकणार, यावरच या गटातील उमेदवाराचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0