मोबाईल, टीव्ही अन् इंटरनेटच्या जमान्यात वासुदेवाची पारंपरिक कला लोप पावण्याच्या मार्गावर!पुढची पिढी ही कला जोपासण्यास तयार नाही; शासनाचेही दुर्लक्ष, वासुदेव गजानन उर्फ गोपाल कानडे यांची खंत..इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वासुदेव कलेला पुन्हा उभारी देण्याची गरज..

मोबाईल, टीव्ही अन् इंटरनेटच्या जमान्यात वासुदेवाची पारंपरिक कला लोप पावण्याच्या मार्गावर!

पुढची पिढी ही कला जोपासण्यास तयार नाही; शासनाचेही दुर्लक्ष, वासुदेव गजानन उर्फ गोपाल कानडे यांची खंत..

इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वासुदेव कलेला पुन्हा उभारी देण्याची गरज..

अहिल्यानगर/प्रशांत बाफना


मोबाईल, टीव्ही आणि इंटरनेटच्या आधुनिक युगात महाराष्ट्राची जुनी लोकपरंपरा आणि संस्कृती जपणारी वासुदेवाची कला हळूहळू लोप पावत चालली आहे.

एकेकाळी गावोगावी पहाटेच्या वेळी देवाचे नाव घेत, समाजप्रबोधनाचे संदेश देत दारोदारी फिरणारा वासुदेव आज मात्र दुर्लक्षित झाला आहे. या कलेला ऐतिहासिक महत्त्व असूनही शासन आणि समाजाकडून अपेक्षित पाठबळ मिळत नसल्याची खंत वासुदेव गजानन उर्फ गोपाल बाबासाहेब कानडे यांनी व्यक्त केली.

वासुदेव ही केवळ मनोरंजन करणारी कला नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा महत्त्वाचा वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही वासुदेवाच्या माध्यमातून संदेश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचविण्याची महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली जात असल्याचे सांगितले जाते. सांकेतिक भाषा, विविध इशारे आणि संदेशांच्या माध्यमातून गुप्त माहिती पोहोचविण्याच्या कामातही वासुदेवांचा उपयोग होत असे. त्यामुळे इतिहासाच्या पानांमध्ये या पारंपरिक कलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

मात्र आजच्या आधुनिक जीवनशैलीत या कलेचे महत्त्व कमी होत चालले आहे. पूर्वी गावातील लोक पहाटे वासुदेवाची वाट पाहत असत. त्याच्या मुखातून निघणारे देवाचे नामस्मरण, अभंग आणि समाजप्रबोधनाचे विचार ऐकण्यासाठी नागरिक उत्सुक असायचे. आता मोबाईल आणि इंटरनेटच्या वाढत्या प्रभावामुळे या पारंपरिक कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. सर्वांचेच दुर्लक्ष होत असल्याने ही कला टिकविण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

‘आमची पुढची पिढी ही कला जोपासण्यासाठी तयार नाही. कारण या कलेकडे समाजाचे आणि शासनाचेही दुर्लक्ष झाले आहे. वासुदेव कलाकारांना कोणतेही ठोस आर्थिक पाठबळ किंवा प्रोत्साहन मिळत नाही. त्यामुळे पुढील पिढीने ही कला स्वीकारायची कशी? आम्ही अनेक आंदोलने केली, मोर्चे काढले; मात्र अद्याप आमच्या प्रश्नांची कोणीही गांभीर्याने दखल घेतलेली नाही,’ अशी व्यथा गोपाळ कानडे यांनी मांडली.

वासुदेवाचा वापर आजही अनेक राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच निवडणूक प्रचारासाठी केला जातो. विविध कार्यक्रमांमध्ये पारंपरिक वेशभूषेत वासुदेव आपली कला सादर करतात. मात्र कार्यक्रमापुरता वापर करून घेतला जातो, पण कलाकारांच्या उदरनिर्वाहाचा आणि त्यांच्या कलेच्या संवर्धनाचा प्रश्न कायम दुर्लक्षित राहतो, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

पहाटे पाच वाजताच सुरू होते वासुदेवाची दिनचर्या!
वासुदेवाचे जीवन हे परंपरा, श्रद्धा आणि कलेशी जोडलेले आहे. पहाटे पाच वाजताच त्यांची दिनचर्या सुरू होते. डोक्यावर मोरपिसांचा मुकुट, अंगावर पारंपरिक पोशाख, हातामध्ये टाळ आणि चिपळ्या घेऊन मुखातून देवाचे नामस्मरण करत वासुदेव गावोगावी, दारोदारी फिरत असतो. आपल्या गाण्यांतून भक्तीचा संदेश देतानाच समाजाला चांगले विचार आणि प्रबोधनाचे धडे देण्याचे काम तो करत असतो.
आजच्या धावपळीच्या आणि आधुनिक जगात ही परंपरा टिकवायची असेल तर केवळ कलाकारांनी प्रयत्न करून चालणार नाही, तर समाज आणि शासनानेही पुढाकार घेणे गरजेचे आहे. वासुदेव कलाकारांना आर्थिक मदत, मानधन, शासकीय योजनांचा लाभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नियमित संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. अन्यथा महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा हा अनमोल ठेवा पुढील पिढीला केवळ पुस्तकांमध्येच पाहायला मिळेल, अशी भावना व्यक्त होत आहे
Previous Post Next Post