ऊसतोडीसाठी पैसे द्या, अन्यथा दुसरी टोळी पहा!; दुष्काळात शेतकर्‍यांवर दुहेरी संकट.शेवगावमध्ये ऊस उत्पादक शेतकर्‍यांची आर्थिक अडवणूक;

ऊसतोडीसाठी पैसे द्या, अन्यथा दुसरी टोळी पहा!; दुष्काळात शेतकर्‍यांवर दुहेरी संकट.

शेवगावमध्ये ऊस उत्पादक शेतकर्‍यांची आर्थिक अडवणूक;

प्रशांत बाफना | अहिल्यानगर 


शेवगाव | एकीकडे पावसाअभावी ऊस पिके जळून जाण्याची वेळ, दुसरीकडे घटते उत्पादन आणि त्यातच ऊसतोडीसाठी विविध स्तरांवर पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारींमुळे ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. पैसे द्या, तरच ऊसतोड; अन्यथा दुसरी टोळी पाहा अशा प्रकारची अडवणूक होत असल्याचा आरोप शेतकर्‍यांकडून केला जात आहे. ऊसाचा अंतिम भाव अद्याप जाहीर झालेला नसतानाच ऊसतोडीसाठी होणार्‍या या कथित आर्थिक मागण्यांमुळे शेतकर्‍यांच्या अडचणीत भर पडली आहे. या प्रकाराची साखर आयुक्तालयाने तातडीने दखल घेऊन संबंधितांना सक्त ताकीद द्यावी, अशी मागणी होत आहे.

साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होताच ऊसतोडीसाठी शेतकर्‍यांची धावपळ सुरू झाली आहे. यंदा पावसाने ओढ दिल्याने अनेक भागांतील पाण्याचे स्रोत आटले आहेत. परिणामी पाण्याअभावी ऊस पिके जळाली असून काही क्षेत्रांतील ऊस जळण्याच्या मार्गावर आहे. हातात आलेले पीक वाया जाऊ नये आणि उपलब्ध उसाला तातडीने तोड मिळावी, यासाठी शेतकरी विविध कारखान्यांकडे विनंती करीत आहेत.मात्र, ऊसतोड कामगार, हार्वेस्टर चालक, ट्रॅटर चालक, जीटी ट्रॅटर, टायर बैलगाडी चालक, मुकादम आणि स्लिप मास्तर यांच्याकडून वेगवेगळ्या कारणांनी पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. ऊसाचे वजन दिवसेंदिवस घटत असल्याने शेतकर्‍यांना नाईलाजाने या मागण्या मान्य कराव्या लागत असल्याचे चित्र आहे.हार्वेस्टर मशीनसाठी एकरी ३ हजार रुपये, ट्रॅटरसाठी प्रत्येक ट्रिपला २०० रुपये, जीटी ट्रॅटरसाठी ५०० रुपये, ट्रक चालकासाठी प्रत्येक ट्रिपला ५०० रुपये, काही स्लिप मास्तरांकडून २ हजार रुपयांची मागणी, ऊसतोड कामगारांसाठी चहा, नाश्ता आणि दोन वेळच्या जेवणाचा खर्च, काही ठिकाणी वाहनांसाठी डिझेलचीही मागणी होत असल्याचा आरोप.त्यामुळे कारखाना प्रशासनाने शेतकर्‍यांना संरक्षण देऊन अशा तक्रारींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

पैसे मागितल्यास लेखी तक्रार करा!
शेतकर्‍यांकडून ऊसतोडीसाठी पैसे घेतल्यास संबंधित मुकादमाची लेखी तक्रार कारखान्याकडे करावी. कारखान्याने तक्रारीची दखल घेऊन संबंधित रक्कम वसूल करून शेतकर्‍याला भरपाई द्यावी. कारखान्याकडून भरपाई मिळाली नाही, तर शेतकर्‍यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे तक्रार करावी. आम्ही संबंधितांकडून पैसे वसूल करून देण्यासाठी प्रयत्न करू. – दत्तात्रय फुंदे, जिल्हा उपाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
Previous Post Next Post