सुल्तानपुरला जखमी बिबट्या जेरबंद, वैद्यकीय उपचारासाठी नासिकला रवाना... (नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी) : सुलतानपूर ता. शहादा येथे दुपारी तीन वाजेच्या सुमारास येथील आश्रम शाळेचा जवळ असलेल्या बाभळांच्या दाट झाडांमध्ये एका प्राण्याच्या आवाज तेथून जाणाऱ्या ग्रामस्थांना आला. त्यांनी तिथे डोकावून पाहिले असता एक बिबट्या जखमी अवस्थेत त्या झुडपांमध्ये अडकला असल्याचे दिसून आला. त्यांनी तात्काळ अरडाओरड सुरू केली. तेथील काही ग्रामस्थांनी तात्काळ राणीपूर येथील वनक्षेत्रपाल व म्हसावद पोलिसांना संबंधित घटनेची माहिती दिली. त्यानंतर वनविभागाने रेस्क्यू ऑपरेशन करत त्या बिबट्याला सुरक्षित जेरबंद करत राणीपूर येथे नेले. त्याची तपासणी केल्यानंतर त्याला तात्काळ रात्री उशिरा पुढील उपचारासाठी नाशिक येथे नेण्यात आल्याचे वन वनविभागाने सांगितले आहे. सुलतानपूर ता. शहादा येथे आज दि. 04 रोजी दुपारी तीन वाजता तेथील आश्रम शाळेजवळ असलेल्या दाट बाभळींच्या झाडांमध्ये एक वर्षीय बिबट्या जखमी अवस्थेत आढळून आला. तेथून जाणाऱ्या काही ग्रामस्थांना कुठल्यातरी प्राण्यांच ओरडण्याच्या आवाज त्या झाडांमधून येत असल्याचा आवाज ऐकला. त्यांनी त्या दाट झाडांमध्ये पाहिले असता तेथे एक बिबट्या जखमी अवस्थेत जोरजोरात ओरडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी बिबट्या असल्याची खात्री केल्यानंतर तात्काळ आरडाओरड करत सुलतानपूर येथील काही ग्रामस्थांना एकत्र केले. त्यातील एका ग्रामस्थाने तात्काळ राणीपूर येथील वनक्षेत्रपाल महेश चव्हाण यांना व म्हसावद येथील पोलीस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक श्री. पाटील यांना संबंधित घटना सांगितली. घटनेची माहिती मिळताच राणीपूर वनक्षेत्रपाल महेश चव्हाण यांनी शहादा येथील सहाय्यक उपवनसंरक्षक संजय राज साळुंखे यांना संबंधित घटनेची तात्काळ माहिती दिली. संजय साळुंखे यांनी तात्काळ बिबट्याला रेस्क्यू करण्याचे आदेश देत तेही घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाचे राणीपूर वनक्षेत्रपाल महेश चव्हाण शहाद्याचे वनक्षेत्रपाल आशुतोष मेढे व वनपाल चारुशीला काटे, वनरक्षक संजय मोहिते यांच्यासह वन विभागाचे व पोलीस प्रशासनाचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ परिस्थिती करीत जेसीबीच्या साह्याने तेथील बाभळांची दाट असलेली झाडे तोडत बिबट्यासाठी पिंजरा लावला. बिबट्याची संपूर्ण पाहणी केल्यानंतर बिबट्या हा गंभीर जखमी असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी त्यावर जाळीच्या साह्याने त्याला जेरबंद केले. त्यानंतर त्याला राणीपूर येथील वन विभागाच्या कार्यालयात आणले. तेथे त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला पुढील उपचारासाठी तात्काळ नाशिक येथे घेऊन जाण्याच्या सल्ला वनविभागाला दिला. वनविभागाने रात्री त्या बिबट्याला नाशिक येथे रवाना केले असल्याची माहिती दिली. हा जखमी बिबट्या त्या झाडाझुडपांमध्ये कसा व कुठून आला यासाठी सहाय्यक वनसंरक्षक संजय साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली. जखमी बिबट्या हा कशामुळे जखमी झाला आहे त्याचीही माहिती वन विभाग घेत असून खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन वनविभागाने केले आहे. परिसरात वन विभागामार्फत तपासणी सुरू असल्याची माहिती वनक्षेत्रपाल महेश चव्हाण यांनी दिली आहे.

Previous Post Next Post