लाडकी बहीण योजनेचे शहादा, तळोदा या तालुक्यांमधून सुमारे 90 हजार अर्ज मंजूर... (नंदुरबार जिल्हा विभागीय संपादक) : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत शहादा व तळोदा तालुक्यातून आतापर्यंत 91 हजार 606 अर्ज प्राप्त झाले होते. त्या सर्व अर्जाची सोमवारी संध्याकाळी छाननी करण्यात आली. यात शहादा व तळोदा तालुके मिळून सुमारे 90 हजार अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. अपूर्ण कागदपत्रे अथवा तांत्रिक अडचणीत अडकलेल्या सुमारे दोन हजार अर्जांवर गतीने काम सुरू आहे. त्यामुळे शंभर टक्के बहिणींचे अर्ज मंजूर होणार असल्याची माहिती लाडकी बहीण योजनेच्या अशासकीय समितीचे अध्यक्ष आमदार राजेश पाडवी यांनी दिली. राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या वर्षी १ जुलैपासून लागू करण्यात आली. त्यासाठी पहिल्या दिवसापासूनच अर्ज भरण्याची प्रक्रिया जोरात सुरू होती. महिलांचा या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अर्ज दाखल करण्यासाठी सेतू केंद्र, आपले सरकार तसेच अंगणवाडी केंद्रात महिलांच्या रांगा लागल्याचे आजही पाहावयास मिळत आहे. एकीकडे शेतीकामाची धांदल आणि दुसरीकडे 'लाडकी बहीण' योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी महिलांची होणारी गर्दी यामुळे नोंदणीचे उद्दिष्ट साध्य करणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान होते. प्राप्त 91 हजार 606 अर्जांच्या छाननी अंती 89 हजार 632 लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात येऊन पुढील कार्यवाहीसाठी आ. पाडवी यांचा स्वाक्षरीने पाठवण्यात आले. रक्षाबंधनापूर्वीच या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. शहादा तालुक्यात एकूण 64 हजार 924 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी तालुकास्तरीय समितीने 64 हजार 110 अर्ज मंजूर केले आहेत. तर तळोदा तालुक्यात 26 हजार 682 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 25 हजार 522 अर्ज मंजूर केले आहेत. लाभार्थ्यांचे अर्ज छाननीअंती मंजूर करण्यात येऊन पुढील कार्यवाहीसाठी आ. पाडवी यांचा स्वाक्षरीने पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे रक्षाबंधनापूर्वीच 89 हजार 632 बहिणींना पैसे मिळणार आहेत. दरम्यान, शहादा-तळोदा मतदार संघाच्या अशासकीय समितीचे अध्यक्ष आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले की, प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र लाभार्थी बहिणींना रक्षाबंधन सणापूर्वीच भेट मिळणार आहे. मात्र, कागदपत्रां अभावी अथवा विविध कारणांमुळे जे अर्ज मंजूर झाले नाहीत अशा 1 हजार 974 अर्जावर कार्यवाही सुरू आहे. लवकरच त्यांचे अर्ज मंजूर करून लाडक्या बहिणींनी लाभ देण्याचा समितीचा प्रयत्न आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0