चारित्र्याच्या संशयातून घडले जीवघेणे कांड..पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून पतीची आत्महत्या.. (गजानन जिदेवार आष्टीकर तालुका प्रतिनिधी हदगाव) हदगाव : चौकट : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यामध्ये कुऱ्हाडीने वार करून पतीने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली. सदर जीवघेणे कांड तालुक्यातील ल्याहरी येथे १० ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता घडले. या घटनेमुळे हदगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान गंभीर जखमी झालेल्या पत्नीस उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे.या घटनेवावत मिळालेली माहिती अशी की, मयत सिताराम शिवराज मात्रे वय ४५ यांचे कुटुंब हे मुळ नाव्हा येथील रहिवाशी असून दोन वर्षांपूर्वी ल्याहरी येथे आपल्या मेहुण्याकडे रोजमजुरीची कामे करण्यासाठी पत्नी आणि मुलांसह राहत होते. मात्रे यांची मुलगी विवेकानंद शाळेला असून मुलगा हा हदगाव येथे एका डॉक्टरांकडे कामासाठी आहे. मयत सिताराम मात्रे नेहमीच आपली पत्नी सुनीता सिताराम मात्रे वय ३८ हिच्या चारित्र्याच्या संशय घेत असे. या विषयावरून नेहमीच दोघांमध्ये वाद होत असे. यातून पत्नीला मारहाणही करीत होता. दि. १० ऑगस्ट रोजी सकाळी त्यांच्यामध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला हा वाद एवढा विकोपाला गेला त्यांच्यामध्ये हाणामारीचे रूपांतर झाले. यानंतर मयत सिताराम याने घरात असलेली कुऱ्हाड काढली आणि पत्नीच्या डोक्यामध्ये तीन ते चार वार केले. पत्नीने आरडाओरडा केला बाजूला असलेले नागरिक धावून आले, तोपर्यंत पत्नी वेशुद्ध अवस्थेमध्ये जमिनीवर कोसळली. तेव्हा सिताराम यास, आपली पत्नी आता मृत्यूमुखी पडली, आपले काही खरे नाही या धास्तीने त्याने घरातच नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवली. दरम्यान गावकऱ्यांनी गंभीर जखमी झालेल्या सुनिता मात्रे यांना उपचारासाठी हदगाव येथे नेले. या घटनेची माहिती मिळताच हदगावचे पोलीस निरीक्षक पुरी, पोलीस उपनिरीक्षक रायवोळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून सिताराम मात्रे यांचा मृतदेह शवविच्छेदनसाठी हदगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. तर सुनीता सिताराम मात्रे यांच्या डोक्याला कुऱ्हाडीचे जबर वार बसल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली रायवोळे करीत आहेत. या घटनेमुळे ल्याहरीसह हदगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Previous Post Next Post