**पाडळसे: ग्रामपंचायतीच्या ठरावाशिवाय माती वाहतुकीला परवानगी दिल्याप्रकरणी सरपंचांवर कारवाईची मागणी; सर्कल अधिकारी घटनास्थळी दाखल.**. पाडळसे गावात सरपंच सौ. गुणवंती सुरज पाटील यांनी ग्रामपंचायतीचा कोणताही ठराव न घेता, परस्पर सावदा येथील एका व्यक्तीला गावातील सर्वे नं. १२३४ मधील गौशाळा परिसरातील माती खोदून वाहतूक करण्यास परवानगी दिल्याने गावात संतापाचे वातावरण आहे.या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच सर्कल अधिकारी सौ. बबिता चौधरी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, **ग्रामपंचायतीला माती वाहतुकीस परवानगी देण्याचा कोणताही अधिकार नाही**. हे अधिकार पूर्णपणे महसूल विभागाच्या अखत्यारीत येतात आणि त्यासाठी योग्य त्या परवानग्या घेणे बंधनकारक आहे.यावेळी ग्रामपंचायत सदस्या सौ. पुनम पाटील, सदस्य छोटू बाविस्कर, उपसरपंच सौ. अलका कोळी तसेच सामाजिक कार्यकर्ते भरत चौधरी, योगेश चौधरी यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंचांच्या या एकतर्फी निर्णयामुळे ग्रामसभेचा अपमान झाल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0