रात्रीचा सिंगल फेज विद्युत पुरवठा द्या : शेतकऱ्यांची मागणी; महावितरणकडे निवेदन सादर... (वर्धा जिल्हा विभागीय संपादक अब्दुलकदीर शेख)गिरड :यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन हातातून गेल्याने आणि कापसाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. आता त्यांच्या आशा रब्बी हंगामातील हरभरा, गहू, ज्वारी, कापूस व तुरी पिकांच्या सिंचनासाठी आवश्यक असलेला पुरेसा विद्युत पुरवठा न मिळाल्यास या पिकांच्याही उत्पादनावर संकट ओढवू शकते, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.गिरड व मोहगाव परिसरातील शेतकऱ्यांनी महावितरणचे अभियंता विनोद खांडरे यांच्याकडे निवेदन देऊन दिवसाला १२ तास तीन फेज व रात्रीसाठी एक फेज असा वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. शेती हा आमचा जीवंत कारखाना असून आम्ही दिवसरात्र त्यावर मेहनत घेतो. दिवसा मशागतीचे काम करून रात्री शेतावर देखरेख करावी लागते. परंतु रात्रीचा वीजपुरवठा पूर्णतः बंद असल्याने सिंचन ठप्प होते तसेच पिकांचे संरक्षण करणेही अवघड बनते. रात्री शेतावर प्रकाश नसल्याने वन्यप्राण्यांचा धोका वाढतो. त्यामुळे किमान एक फेज वीज उपलब्ध झाल्यास शेतावर थोडीफार भटकंती करून पिकांची देखरेख व सुरक्षेचे काम सुकर होईल. सध्या वीजपुरवठा वेळोवेळी खंडित होत असल्याने मोटर चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.यंदाच्या अनियमित हवामानामुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत आलेले असताना, वीजपुरवठ्याची ही समस्या त्यांच्या संकटात भर टाकणारी ठरत आहे. म्हणून शेतकऱ्यांनी दिवसासाठी १२ तास तीन फेज व रात्रीसाठी एक फेज असा वीजपुरवठा तातडीने सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना गिरडचे उपसरपंच मंगेश गिरड, मोहगावचे सरपंच विलास नवघरे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
byMEDIA POLICE TIME
-
0