यावल नगरपरिषद निवडणुकीपूर्वी पोलिसांची मोठी कारवाई: ५० पेक्षा अधिक गुन्हेगार ताब्यात.. (यासीन तडवी यावल तालुका विभागीय संपादक पोलीस टाईम मीडीया) येत्या २ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावल शहरात कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून मोठी मोहीम राबविण्यात आली. शांततापूर्ण, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात निवडणूक पार पाडण्याच्या उद्देशाने पोलिसांनी परिसरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशान्वये तसेच फैजपूर विभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तालुक्यात ऑल आउट आणि कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या कारवाईसाठी ५ पोलीस अधिकारी आणि ५ विशेष पथके नेमण्यात आली होती. पथकांनी संवेदनशील ठिकाणांसह संशयितांच्या घरांची तपासणी करून उपद्रवी व रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेतले.मोहीमेदरम्यान यावल तालुक्यातील विविध गावांमध्ये तपासणी मोहिमा, वाहन तपासणी, घरांची पडताळणी आणि संशयितांची चौकशी करण्यात आली. पोलिसांनी तलवारी, धारदार शस्त्रे आणि गुन्हेगारी कृत्यात वापरले जाणारे काही साहित्य जप्त केल्याची माहितीही समोर आली आहे.निवडणुकांच्या अनुषंगाने कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणू शकणाऱ्या ५० पेक्षा अधिक व्यक्तींना ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हलविण्यात आले.निवडणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, मतदारांमध्ये भयाचे वातावरण निर्माण होऊ नये आणि पूर्ण जिल्ह्यात शांततेचे वातावरण टिकून राहावे यासाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची असल्याचे पोलिसांनी सांगितले. यावल शहर तसेच तालुक्यातील नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले असून पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक व्यक्त केले आहे.

यावल नगरपरिषद निवडणुकीपूर्वी पोलिसांची मोठी कारवाई: ५० पेक्षा अधिक गुन्हेगार ताब्यात..                             
Previous Post Next Post