*हक्कभंग प्रकरणात पत्रकार पती-पत्नीला पाच दिवसांची शिक्षा…राज्यातील पहिलाच प्रकार…. अकोला जिल्हा पत्रकार संघाकडून तीव्र निषेध*. (इमरान खान अकोला जिल्हा प्रतिनिधि) अकोला:हक्कभंग प्रकरणात पत्रकार पती-पत्नीला पाच दिवसांची शिक्षा…राज्यातील पहिलाच प्रकार…अकोला जिल्हा पत्रकार संघाकडून तीव्र निषेध : राज्यात हक्कभंग प्रकरणात पत्रकारांवर थेट कारावासाची शिक्षा सुनावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी दाखल केलेल्या विशेषाधिकार हक्कभंग प्रकरणात विधान परिषद सभापतींनी अकोल्यातील इलेक्ट्रॉनिक मीडियाशी संबंधित तीन पत्रकार व एक कॉंग्रेस कार्यकर्ता यांना पाच दिवसांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे.या प्रकरणात पत्रकार गणेश सोनवणे, हर्षदा सोनवणे (पती-पत्नी) अमोल नांदूरकर आणि अंकुश गावंडे (कॉंग्रेस कार्यकर्ता) यांना दोषी ठरवत सभापतींनी पाच दिवसांची शिक्षा जाहीर केली. विशेष म्हणजे पत्रकार पती-पत्नीला एकाच प्रकरणात शिक्षा होण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रकार मानला जात आहे.दरम्यान, याच प्रकरणात ‘सत्य लढा’ या युट्यूब चॅनेलचे संपादक सतीश देशमुख यांनी सभापतींकडे लेखी माफी मागितली. माफी स्वीकारत सभापतींनी देशमुख यांना या कारवाईतून वगळत माफी दिली आहे.या संपूर्ण घटनेमुळे राज्यातील पत्रकार वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, अकोला जिल्हा पत्रकार संघाने या कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. पत्रकार संघाच्या मते, ही कारवाई अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारी असून, पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणारी आहे.पत्रकार संघाने स्पष्ट भूमिका घेत म्हटले आहे की, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर अशा प्रकारे कठोर कारवाई होणे चिंताजनक आहे. मतभेद असतील तर संवादाच्या मार्गाने तोडगा काढणे अपेक्षित आहे. कारावासासारखी शिक्षा देणे हे माध्यमस्वातंत्र्यावर आघात करणारे आहे.*प्रकरण काय आहे?…* महायुती सरकारमध्ये अजित पवार सामील झाल्यानंतर अकोल्यातील काँग्रेस कार्यकर्ते अंकुश गावंडे यांनी आमदार अमोल मिटकरी यांना डिवचले होते. यानंतर दोघांमध्ये मोबाईलवर शाब्दिक चकमक झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर अंकुश गावंडे यांनी अमोल मिटकरी यांची मनोरुग्णालयात तपासणी करण्याबाबत नोंद केली होती.या नोंदीसंदर्भातील बातम्या अकोल्यातील काही पत्रकारांनी प्रसिद्ध केल्या होत्या. या बातम्यांमुळे आमदार अमोल मिटकरी यांची राज्यभर बदनामी झाल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे आमदार मिटकरी यांनी आपला विशेषाधिकार वापरत संबंधित चार पत्रकारांविरोधात हक्कभंगाची कारवाई दाखल केली होती.या प्रकरणामुळे माध्यम स्वातंत्र्य, विशेषाधिकार हक्क आणि लोकशाहीतील पत्रकारांची भूमिका यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. येत्या काळात या निर्णयाविरोधात कायदेशीर व संघटनात्मक पातळीवर पावले उचलली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हक्कभंग प्रकरणात पत्रकार पती-पत्नीला पाच दिवसांची शिक्षा…राज्यातील पहिलाच प्रकार….     अकोला जिल्हा पत्रकार संघाकडून तीव्र निषेध*.             
Previous Post Next Post