लोणखेड्याची खरी 'पालवी' - मरूनही फुटला नवजीवनाचा अंकुर; 13 वर्षीय चिमुरडीच्या अवयवदानाने पाटील कुटुंबाचा आदर्श

लोणखेड्याची खरी 'पालवी' - मरूनही फुटला नवजीवनाचा अंकुर; 13 वर्षीय चिमुरडीच्या अवयवदानाने पाटील कुटुंबाचा आदर्श

नंदुरबार जिल्हा विभागीय उपसंपादक प्रा. डी. सी. पाटील

शहादा  : ‘पालवी’ म्हणजे झाडाला फुटणारा नवा कोवळा अंकुर... नावाप्रमाणेच अवघ्या तेरा वर्षांच्या आयुष्यात या चिमुकलीने जाताना इतरांच्या आयुष्यात नवजीवनाचा अंकुर फुलवला आहे. मृत्यूलाही हरवून लावणाऱ्या तिच्या दातृत्वाने अवघा शहादा तालुका हळहळला असून तिच्या कार्याला सलाम करत आहे.

मूळ लोणखेडा येथील व सध्या गांधीनगर येथे वास्तव्यास असलेले नरेंद्रभाई गणेश पाटील व सौ. अश्विनी नरेंद्र पाटील यांची 13 वर्षीय कन्या आणि गणेशभाई गोविंद पाटील यांची नात - कु. पालवी हिचे नुकतेच दुःखद निधन झाले. ज्या वयात हातात पुस्तके आणि अंगणात खेळ असायला हवा, त्याच वयात नियतीने तिच्यावर घाला घातला.

*दोन महिन्यांपूर्वी ब्रेन ट्युमरचे निदान...
दोन महिन्यांपूर्वी पालवीला ब्रेन ट्युमर असल्याचे निष्पन्न झाले होते. कुटुंबीयांनी तातडीने तिला गांधीनगर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले. मात्र, उपचारांना प्रतिसाद मिळत नसल्याने तिला ब्रेन डेड घोषित करण्यात आले आणि अखेर तिने अखेरचा श्वास घेतला.

*दुःखातही दाखवले माणुसकीचे मोठे मन..
लाडक्या लेकीच्या जाण्याने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. पण या अतिशय कठीण प्रसंगातही कुटुंबाने मोठे मन आणि सामाजिक बांधिलकी दाखवली. आमची पालवी गेली तरी तिच्या अवयवांतून इतरांनी जगावे, या उदात्त भावनेतून कुटुंबाने तिच्या अवयवदानाचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

पालवीचे हृदय, डोळे आणि इतर महत्त्वपूर्ण अवयव गांधीनगर येथील रुग्णालयात दान करण्यात आले. तिच्या या दानामुळे अनेक गरजू रुग्णांना नवे आयुष्य मिळाले असून त्यांच्या कुटुंबात आनंद परतला आहे.
स्वतःचे मूल गमावण्याच्या महादुःखातही दुसऱ्याच्या मुलाचे प्राण वाचवण्याचा विचार करणे हीच खरी मानवसेवा आहे. पालवीने "मृत्यूनंतरही जीवन देता येते" हा संदेश संपूर्ण समाजाला दिला आहे.

*अहिंसा चौकात पुष्पवृष्टीने अखेरचा निरोप..
पाटील कुटुंबाच्या या निर्णयाचे शहादा डॉक्टर असोसिएशन, संकल्प ग्रुप, इन्कलाब फाउंडेशनसह सर्व सामाजिक संस्थांनी स्वागत व कौतुक केले आहे.

पालवीचे पार्थिव शहादा येथे आणल्यानंतर हॉटेल रेसिडेन्सी जवळील अहिंसा चौकात नागरिक आणि विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी तिच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी करून तिला अखेरचा सलाम केला. त्यानंतर आसुस, ता. शहादा येथील शेतात शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लहान वयात मोठा आदर्श निर्माण करणाऱ्या या चिमुकल्या देवदूताला सर्व स्तरातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
Previous Post Next Post