गुटखा, माव्यावर एलसीबीची छापेमारी; थट्टा मस्करी महागात, व्यावसायिकाला मारहाण…4 छाप्यांत 4.35 लाखांचा मुद्देमाल जप्त

गुटखा, माव्यावर एलसीबीची छापेमारी; थट्टा मस्करी महागात, व्यावसायिकाला मारहाण…

4 छाप्यांत 4.35 लाखांचा मुद्देमाल जप्त


अहिल्यानगर । प्रशांत बाफना

जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध गुटखा, मावा आणि सुगंधित तंबाखू विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. श्रीरामपूर, शनिशिंगणापूर आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चार ठिकाणी छापे टाकून सात आरोपींविरुद्ध चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत तब्बल 4 लाख 35 हजार 85 रुपयांचा गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू व मावा जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके तयार करण्यात आली.

या पथकांनी 23 ऑगस्ट रोजी श्रीरामपूर शहर, शनिशिंगणापूर आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध गुटखा, मावा व सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्यांची माहिती घेत कारवाई केली.श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करून 3 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी शाहरूख शहानूर शहा (31, रा. श्रीरामपूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून शोएब शेख हा फरार आहे.शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईत 21 हजार 488 रुपयांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आला. या प्रकरणातील अनिल माधव वाघ हा फरार आहे.संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करण्यात आली. पहिल्या कारवाईत 36 हजार 788 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वसीम मेहमूद खान हा आरोपी फरार आहे. दुसऱ्या कारवाईत 6 हजार 809 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अझहर दिलावर पठाण (37) याला ताब्यात घेण्यात आले असून आत्तु उर्फ आदिब आयुबखान पठाण आणि पाशा उर्फ फिरदोषखान पठाण हे दोघे फरार आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे तसेच पोलीस अंमलदार भिमराज खर्से, रमिझराजा आत्तार, आजिनाथ पाखरे, बाळासाहेब नागरगोजे, विशाल तनपुरे, रिचर्ड गायकवाड, सागर ससाणे, सुयोग सुपेकर, विकास साळवे, निळकंठ कारखेले, योगेश कर्डीले आणि सतीष भवर यांच्या पथकाने केली.



गोदामावरून वाद; व्यावसायिकाला मारहाण
अहिल्यानगर/प्रशांत बाफना : जुना बाजार परिसरातील बॉम्बे बेकरी गोदामावरून झालेल्या वादातून बेकरी व्यावसायिक व त्यांच्या भावाला लाकडी काठीने आणि लाथाबुक्क्‌‍यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सावेडी येथील रहिवासी असलेले बेकरी व्यावसायिक मोहम्मद अब्दुलरहमान चाऊस (वय 30) हे रविवारी सकाळी जुना बाजार रोडवरील आपल्या बॉम्बे बेकरी गोदामात गेले होते. त्यावेळी आरोपी आयान नाशिर बागवान, शकील बागवान, दोन महिला व इतर दोन अनोळखी इसम तेथे आले. त्यांनी मगोदाम उघडायचे नाही आणि या रस्त्याने यायचे नाही असे म्हणत दमदाटी सुरू केली. फिर्यादी गोदामाचे शटर उघडून आत गेले असता, आरोपींनी पाठीमागून येऊन मोहम्मद चाऊस व त्यांच्या भावाला लाकडी काठ्या आणि लाथाबुक्क्‌‍यांनी बेदम मारहाण केली. तसेच गोदामाच्या खिडक्यांच्या काचा व बेकरीचे मशिन फोडून मोठे नुकसान केले. जखमींना उपचारासाठी तातडीने सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला.

बकऱ्या चारण्यास विरोध केल्याने हल्ला
अहिल्यानगर/प्रशांत बाफना : शेतातील झाडे बकऱ्या खात असल्याने त्यांना चारण्यास मज्जाव केल्याच्या कारणावरून दोघा भावांवर लोखंडी रॉड व कमरेच्या पट्ट्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना तपोवन रोडवरील काकडे मळा परिसरात घडली असून, याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी गोपीनाथ बबन काकडे (वय 37, रा. तपोवन नगर, काकडे मळा, अहिल्यानगर) यांचा मोठा भाऊ गोरख काकडे यांनी आरोपींना शेतात बकऱ्या चारू नका, झाडांचे नुकसान होते असे सांगितले. याचा राग येऊन आरोपींनी वाद घालत घरच्यांना बोलावून घेतले. त्यानंतर आरोपी विशाल कुऱ्हाडे, सागर कुऱ्हाडे व त्यांच्या इतर दोन नातेवाईकांनी मिळून फिर्यादी व त्यांच्या भावाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्‌‍यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी रॉड आणि कमरेच्या पट्ट्याने मारहाण करून दोघांनाही जखमी केले. या हल्ल्‌‍यात जखमी झालेल्या भावांवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. जबाबानुसार तोफखाना पोलिसांनी विशाल कुऱ्हाडे, सागर कुऱ्हाडे व इतर दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी करत आहेत.



थट्टा मस्करी महागात; ग्लास फेकून मारला
अहिल्यानगर/प्रशांत बाफना : थट्टा-मस्करी केल्याच्या किरकोळ कारणावरून एका तरुणावर काचेचा ग्लास फेकून मारून त्याला जखमी केल्याची घटना भिंगार येथे घडली आहे. या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कुणाल भाऊसाहेब बारसे (वय 29, रा. पाटील गल्ली, भोईरे तालीम जवळ, भिंगार) हे मजुरीचे काम करतात. 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास ते भिंगार येथील महाराष्ट्र लस्सी सेंटरजवळ थांबले होते. त्या वेळी त्यांनी आरोपी इसराईल अफजल शेख (रा. सदर बाजार, भिंगार) याच्याशी थट्टा-मस्करी केली. या मस्करीचा राग आल्यामुळे इसराईल शेख याने कुणाल बारसे यांच्या दिशेने काचेचा ग्लास फेकून मारला. हा ग्लास लागल्याने कुणाल यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली. या घटनेनंतर कुणाल बारसे यांनी कॅम्प पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी इसराईल अफजल शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड करत आहेत
Previous Post Next Post